यंदाही ‘सावित्रीच्या लेकी’च अव्वल

 

बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर


राज्याचा निकाल 85.88 टक्के; 2.53 टक्‍क्‍यांनी घट


कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक 93.23 टक्के


नागपूर विभागाचा निकाल हा सर्वांत कमी 82.51 टक्के


दिव्यांगाचा निकाल 92.60 टक्के


पुनर्परीक्षाथींचा 26.55 टक्के निकाल

पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल 85.88 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 2.53 टक्‍क्‍यांनी निकाल घटला असून मागील वर्षीची टक्‍केवारी 88.41 टक्के होती. यात मुलींचा निकाल 90.25 टक्के तर मुलांचा निकाल 82.40 टक्के आहे. मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 7.85 टक्‍क्‍याने अधिक असून निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक 93.23 टक्के, तर नागपूर विभागाचा निकाल हा सर्वांत कमी 82.51 टक्के एवढा लागला आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना गेल्या काही दिवसांपासून निकालाची उत्सुकता लागली होती. अखेर राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे व सचिव डॉ.अशोक भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती दिली आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 1 ते 18 फेब्रुवारी 2019 या कालावधीत झाली. लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत घेण्यात आली. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम या शाखांमधील एकूण 14 लाख 23 हजार 503 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 21 हजार 936 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. यापैकी 12 लाख 21 हजार 159 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

परीक्षेसाठी एकूण 7 लाख 92 हजार 648 मुलांनी अर्जांची नोंदणी केली होती. त्यातील 7 लाख 91 हजार 682 मुले प्रविष्ठ झाली होती. यातील 6 लाख 52 हजार 379 मुले उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 82.40 आहे. मुलींचा विचार करता एकूण 6 लाख 30 हजार 855 मुलांनी अर्जांची नोंदणी केली होती. यातील 6 लाख 30 हजार 254 मुली परीक्षेला प्रविष्ठ झाल्या होत्या. यातील 5 लाख 68 हजार 780 मुली उत्तीर्ण झाल्या. पुनर्परीक्षार्थींचा निकाल 26.55 टक्के लागला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.60 टक्के लागला आहे.

मूळ गुणपत्रक कधी मिळणार?
बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयात मूळ गुणपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येतील. मात्र, याची तारीख अद्याप निश्‍चित झालेली नाही. ही तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांनी स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.