पणत्या, कपडे, दागिन्यांना पारंपरिक “टच’
पुणे – दिवाळीनिमित्त आकाशकंदील, पणत्या, सुशोभनाच्या वस्तू, दागिने आदींची खरेदी ओघाने केली जाते. दरवर्षी यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा ट्रेन्ड पाहायला मिळतो. यंदादेखील पणत्या, कपडे, दागिने या सगळ्यांतच पारंपरिक “टच’ मिळत असल्याचे दिसत आहे.
यंदा दिवाळीवर करोनाचे सावट असले तरी, नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कपडे, होम अप्लायन्सेस, दागिने, आकाशकंदील, सजावटीच्या वस्तू, पणत्या आदी वस्तू खरेदीसाठी किमान आठवडाभर आधीच बाजारपेठांमध्ये गर्दी होते. दरवर्षी या वस्तूंमध्ये वेगळाच “ट्रेन्ड’ चर्चेत असतो. यंदा देखील पारंपारिक खणाचा ट्रेन्ड गाजत असून, विशेषत: महिलांचे लक्ष वेधून घेत आहे.
खणाचा स्पेशल ट्रेन्ड
मागील अनेक खणाचे फ्रॉक, परकर-पोलकी असे काही मोजकेच प्रकार पाहायला मिळत होते. परंतु, यंदा सरस्वती, नथीचे प्रिंट असणाऱ्या खणाच्या साड्या, खणाचे आकाशकंदील, खणाची तोरणे, खणाचे दागिने आदीचा ट्रेन्ड सध्या आहे.
दगडी दिव्यांचा “ट्रेन्ड’
यंदा नागरिकांचा स्वदेशी वस्तू खरेदी करण्यावर भर आहे. दिवाळी पर्यावरणपूरक होण्यासाठी प्लॅस्टिकऐवजी कागदी, कापडी, लाकडी आकाशकंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. यासह यंदा दगडी दिव्यांचादेखील वेगळाच ट्रेन्ड पाहायला मिळत आहे. तर तेलाच्या पणत्यांसह पाण्यावरील पणत्या, गोमय दिव्यांची खरेदी करण्यात नागरिक पसंती दर्शवत आहेत. मोत्याची तोरणे, कापडी फुलांच्या तोरणांचीदेखील चलती आहे.
सोशल मीडियावरही “शॉपिंग’
करोनामुळे काही जण “ऑनलाइन शॉपिंग’वर भर देत आहेत. नामांकित कंपन्यांच्या शॉपिंग साइटसबरोबर व्हॉट्स ऍप, फेसबुकद्वारे देखील “मार्केटिंग’ करण्यात येत आहेत. विविध फेसबुक ग्रुपवर विक्रेत्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येत आहे.