जम्मू – जम्मू-काश्मीरमध्ये सरत्या वर्षात (2020) सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात धडक मोहिमा राबवल्या. त्यामध्ये वर्षभरात 203 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी 37 जण परदेशी नागरिक होते.
दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये लष्कर, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) सहभागी झाले. त्या मोहिमांदरम्यान 49 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. तर, 9 दहशतवादी शरण आले. सरत्या वर्षात दहशतवादी हल्ल्यांच्या 96 घटना घडल्या. त्यामध्ये 43 नागरिक मृत्युमुखी पडले, तर 92 जखमी झाले.
जम्मू-काश्मीरात 2018 मध्ये 215 तर मागील वर्षी 152 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. सरत्या वर्षात पुलवामा, शोपियॉं आणि कुलगामचा समावेश असलेल्या दक्षिण काश्मीरमध्ये सर्वांधिक चकमकी झडल्या.