सोमनाथ ताकवले : 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान वृक्षारोपण मोहीम राबविणार
वडगाव मावळ – महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहीम 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान होत आहे. या मोहिमेत मावळ तालुक्यात 10 लाख 26 हजार 607 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. 10 लाख, 26 हजार 607 वृक्ष लागवडीसाठी नऊ लाख सहा हजार 501 खड्डे खोडून तयार असून उर्वरित 88 हजार 560 खड्डे खोदण्याचे काम सुरू असल्याची माहिती वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी दिली.
मावळ तालुक्यातील वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत 295 हेक्टर वनक्षेत्रात 1 लाख 84 हजार 482 इतके वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शिरोता वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत 145 हेक्टर वनक्षेत्रात 88 हजार 800 इतके वृक्षारोपण केले जाईल. मावळ तहसीलदार कार्यालयाच्या वतीने 30 हजार 446 इतके वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने 1 लाख 83 हजार 646 इतके वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे.
मावळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने 71 हजार 358 वृक्षारोपण करण्यावर भर देणार आहेत. मावळ पंचायत समितीच्या ग्रामविकास व शिक्षण विभाग 31 हजार 546 एवढे वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद 22 हजार इतके वृक्षारोपण करण्यात येणार आहे. लोणावळा नगरपरिषदेतर्फे 22 हजार एवढे वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील 103 ग्रामपंचायतीमध्ये 3 लाख 22 हजार 800 इतके वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम मावळ विभागाच्या वतीने 26 हजार 585 एवढे वृक्षारोपण केले जाईल. पाटबंधारे विभाग पवना, आंद्रा व वडिवळे या हद्दीत 10 हजार 530 इतके वृक्षारोपण करण्यात येणार आहे. मावळ सहकार पणन व वस्त्रोद्योग यांच्या वतीने 2 हजार 988 एवढे वृक्षारोपण होईल. मावळ तालुका आरोग्याधिकारी यांच्या वतीने 623 वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तळेगाव एमआयडीसी उद्योग विभागात 3 हजार 803 वृक्षांची लागवड केली जाणार आहे. टाटा पॉवर यांच्या वतीने 25 हजार इतके वृक्षारोपण करण्यात येणार आहे
वाढते जागतिक उष्णतापमान, पर्यावरणाचा ऱ्हास तसेच बदलत्या वातावरणाचा सजीवांवर होणारा दुष्परिणाम आदीतून वन विभागाच्या वतीने 2016 मध्ये 2 कोटी वृक्ष लागवड, 2017 साली 5 कोटी वृक्ष लागवड, 2018 साली 13 कोटी वृक्ष लागवड व 2019 साली 33 कोटी वृक्ष लागवड होणार आहे. मावळ तालुक्यात यावर्षी 10 लाख 26 हजार 607 विविध देशी वनौषधी तसेच फळांच्या वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.
– सोमनाथ ताकवले,
वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ.