हा विजय मोदी त्सुनामीचा – बड्या नेत्यांकडून कौतुक

नवी दिल्ली – राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील बहुतेक पक्षांच्या बड्या नेत्यांसह भाजपच्य ज्येष्ठ नेत्यांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सामुहिक कामगिरीला दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी म्हणजे “त्सुनामी’ असल्याचे वर्णन अनेकांनी केले आहे. हा विजय म्हणजे भारताचाच आणखी एक विजय आहे, अशा शब्दामध्ये पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या आहेत.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही हा भारताचा विजय असल्याचे म्हटले आहे. विरोधकांच्या खोटा प्रचार आणि वैयक्तिक टीकेच्याविरोधात असलेला हा जनादेश आहे. 2014 मध्ये विरोधकांना जेवढा मोठा पराभव झाला होता, त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात जनतेने विरोधकांना नाकारले आहे. “सबका साथ, सबका विकास’ हा आत्मविश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिला आहे. बिनबुडाचे राजकारण, खोटेपणा आणि वैयक्तिक आरोपांच्या विरोधात जनतेने दिलेला मोठा जनादेश आहे, अशी प्रतिक्रिया अमित शहा यांनी दिली आहे. ह विजय संपूर्ण देशासाठी मोठा विजय आहे. हा विजय युवकांच्या आशांचा, गरिबांचा आणि शेतकऱ्यांचाही आहे. हा विशाल विजय जनतेचा पंतप्रधानांच्या विकासाच्या कामावरील आणि नेतृत्वावरील विश्‍वास दर्शवतो असेही शहा म्हणाले.

तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र या निकालाबाबत अतिशय व्यवहारी दृष्टीकोनातून प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. मात्र पराभूत झालेले सर्वच जण पराभूत झालेले नाहीत. या निकालाबाबत आम्हाला पूर्ण आढावा घ्यावा लागणार आहे. त्यानंतर या निकालाबाबतचे मत व्यक्‍त केले जाऊ शकेल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी हा विजय म्हणजे राष्ट्रीय शक्तीचा विजय असल्याचे म्हटले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू आणि रामविलास पासवान यांनीही या विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींना दिले आहे. लोकसभेच्या निवडणुकीतील ऐतिहासिक विजय हा मोदींच्या दृष्ट्या नेतृत्वाचा, अमित शहा यांच्या गतीशील आणि कठोर परिश्रमांचा आणि भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात केलेल्या कार्याचा विजय आहे, असे राज्नाथ सिंह म्हणले.

तर आता मोदी नवभारताची उभारणी करण्यासाठी सिद्ध झाले आहेत. ही केवळ निवडणुक नाही, तर मोदी त्सुनामी आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे.

सुरेश प्रभू यंनीही मोदींच्या करिष्म्याची तुलना राजकीय त्सुनामी’ अशी केली आहे. “ईस्ट ऑर वेस्ट- बीजेपी इज द बेस्ट, अशी लोकांची भावना आहे. देशाला मोदींच्या नेतृत्वाखाली विकास करायचा आहे, यावर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जनतेने स्पष्टपणे विश्‍वास व्यक्‍त केला आहे, असे प्रभू यांनी म्हटले आहे. राजवर्धन सिंह राठोड यांनी देशातील भाजपच्या अथकपने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना “सॅल्युट’ केला आहे.

कॉंग्रेस पक्षाला निराश झाल्यासारखे वाटत आहे, असे कॉंग्रेसचे प्रवक्‍ते जयवीर शेरगिल यांनी म्हटले आहे, तर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस अतुल कुमार अन्जान यांनी या निकालाबाबत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जबाबदार धरले आहे. राहुल गांधी यांच्या निर्णयांमुळेच विरोधकांची एकी फुटली, असे ते म्हणाले.  कॉंग्रेसने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मजीद मेमन म्हणाले. भाजपसाठीचा पर्याय जनतेने नाकारला आहे. आता भाजपच्याच नेत्यांनी सर्वांची काळजी घ्यावी, असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.