नवी दिल्ली: करोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरलीआहे मात्र तिसऱ्या लाटेचा धोका काही अजून टळलेला नाही. त्यातच करोनाचे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट यामुळे देशाच्या आरोहयो यंत्रणेसह सर्वच यंत्रणा चिंतीत असल्याचे दिसत आहे. या सर्वात करोनाच्या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी बहुपयोगी पद्धत एम्स प्रमुखांनी सांगितली आहे.
दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याविषयी माहिती दिली. डेल्टा व्हेरिएंटबद्दल अधिक माहिती उपलब्ध नसल्यामुळे तो जास्त संसर्गजन्य आहे का, त्याच्यामुळे अधिक मृत्यू होत आहेत का, असे सांगता येणार नाही. परंतु, आपण करोना प्रतिबंधाचे सर्व नियम योग्य पद्धतीने पाळले तर आपण कोणत्याही संभाव्य व्हेरिएंटपासून बचाव करू शकतो, असे डॉ. गुलेरिया यांनी नमूद केले आहे.
There isn’t much data on Delta plus variant to suggest it’s more infectious, causing more deaths, or has developed significant immune escape mechanism. But if we follow COVID appropriate behaviour, we’ll be safe against any of emerging variants: Dr Randeep Guleria, AIIMS Director pic.twitter.com/97q87dWyy5
— ANI (@ANI) July 1, 2021
करोनापासून संरक्षण व्हावे, यासाठी मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे, विशेषतः हात वारंवार धुणे, सुरक्षित अंतर राखणे, यांसारख्या उपायांचे पालन करण्याच्या सूचना वारंवार केल्या जात आहेत, असेही डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे. देशात करोनाचा नवा प्रकार डेल्टा व्हेरिएंटचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशभरातील १० राज्यांमध्ये प्रामुख्याने डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत आहेत.
भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेली कोव्हॅक्सिन लस कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटला प्रभावीपणे नष्ट करत असल्याचे दिसून आले आहे, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने नमूद केले आहे. कोव्हॅक्सिनचा डोस घेतलेल्या दोन नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. या नमुन्यांमध्ये कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंट विरोधात लढण्यासाठीच्या अँटीबॉडी आढळून आल्या आहेत, असे अमेरिकेच्या आरोग्य संस्थेकडून सांगण्यात आले आहे.