नवी दिल्ली : देशातील करोनाच्या लढ्यात सर्वात महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या लसीसंदर्भात सध्या एक मोठा खुलासा समोर आला आहे. देशात आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आलेल्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे शरीरामध्ये अधिक प्रमाणात अॅण्डीबॉडीज (प्रतिपिंडे) निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
करोना व्हॅक्सिन इंडक्टेड अॅण्टीबॉडीज टीट्री (म्हणजेच कोव्हॅट) अंतर्गत करण्यात आलेल्या अभ्यासाहून ही माहिती समोर आली आहे. या अभ्यासामध्ये दोन्हींपैकी कोणत्याही लसीचे दोन डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.
कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींच्या शरीरामध्ये सेरोपोझिटिव्हिटी अॅण्टी-स्पाइक अॅण्टीबॉडीज तयार होण्याचं प्रमाण हे कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांपेक्षा अधिक होते, असे या अभ्यासामध्ये नमूद करण्यात आल्याचे एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. हा अहवाल प्रकाशित झालेला नसून त्यावरील काम सुरु असल्याने सध्या त्याचा वापार क्लिनिकल प्रॅक्टीससाठी करता येणार नाही.
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचे दोन डोस घेतल्यानंतर मोठ्या संख्येने अॅण्टीबॉडीज निर्माण होत आहेत. मात्र सेरोपोझिटिव्हिटी आणि अॅण्टी-स्पाइक अॅण्टीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण हे कोव्हिशिल्ड घेतलेल्यांमध्ये अधिक असल्याचे दिसून आले आहे. सेरोपोझिटिव्हिटी म्हणजेच अॅण्टीबॉडीज शरीरामध्ये असतानाच विषाणूला प्रतिसाद देण्याची क्षमता.
“या अभ्यासामध्ये ५५२ आरोग्य कर्मचारी सहाभगी झाले होते. यापैकी ३२५ पुरुष तर २२७ महिला होत्या. ४५६ जणांना कोव्हिशिल्डचा तर ९६ जणांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला. पहिल्या डोसनंतर ७९.३ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शरीरामध्ये सेरोपोझिटिव्हिटी रेट दिसून आला. कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांमध्ये अॅण्टी-स्पाइक अॅण्टीबॉडीजचे प्रमाण हे कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांपेक्षा अधिक होतं. कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांमध्ये हे प्रमाणे ८६.८ तर कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांमध्ये ४३.८ टक्के इतकं होतं,” असे अहवालात म्हटले आहे.