Nana Patole : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना अनेकवेळा काँग्रेसचा उल्लेख करत टीका केली होती. यामुळे नाना पटोले यांनी यास जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “56 इंचाची छाती असलेल्या मोदींना काँग्रेसची एवढी भीती का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पटोले म्हणाले की, पंतप्रधानांचे भाषण देशहितासाठी नसून सत्तेचा टिकाव लावण्यासाठी होते. टेलिप्राम्प्टरसमोर दिलेले हे भाषण महिलांच्या सन्मानासाठी नव्हते, तर मनुवादी व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. याशिवाय, देशातील जनतेचा पंतप्रधानांवरील विश्वास कमी होत चालल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्याने मंजूर झाले होते, मात्र त्यानंतर 2024 मध्ये जनगणना करण्याचे आश्वासन दिले गेले होते. आता 2026 मध्ये जनगणना सुरू झाली असली, तरी त्यात ओबीसी वर्गासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला. यावरून सरकार बहुजनांच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी देण्याच्या बाबतीतही नाना पटोले यांनी भाजपवर टीका करत काँग्रेसने अधिक महिलांना संधी दिल्याचा दावा केला. एकूणच, “नारीशक्तीला नमन” हा केवळ दिखावा असून सत्तेसाठीचा प्रयत्न असल्याचा आरोप करत पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदींचा काँग्रेससह विरोधी पक्षांवर शाब्दिक हल्ला लोकसभेत नारी शक्ती वंदन हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासयांना संबोधित केले. त्यांनी हे विधेयक पास होऊ न शकल्याबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणात भारतीय महिलांच्या इच्छांना रोखण्यात आलं, त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर करण्यात आला. आमच्यासाठी देशहित सर्वात प्रथम आहे. पण काही लोकांसाठी पक्षहित हे सर्वात मोठं होतं, असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यावेळी देशातील महिलांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. यावेळीही असंच काहीतरी झालं. काँग्रेस, समाजवादी, डीएमके यांच्यामुळेही आता असंच घडलं, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी विरोध पक्षांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल महिला आरक्षण विधेयकावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 30 मिनिटांच्या भाषणात अंदाजे 60 वेळा काँग्रेसचे नाव घेत त्यांनी या पक्षावर राष्ट्रहिताला विरोध केल्याचा आरोप केला. तसेच विविध महत्त्वाच्या विधेयकांना काँग्रेसने विरोध केल्याचे सांगत त्यांनी इतरही विरोधी पक्षांवर टीकेची तोफ डागली. लोकसभेत विधेयक नामंजूर दरम्यान, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेसाठीचे 131 वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत एकमताने नामंजूर झाले आहे. महिला आरक्षणसारखे अत्यंत महत्वाचे विधेयक नामंजूर झाल्याने हा एनडीए सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधेयकाच्या बाजूने 298 तर विधेयकाच्या विरोधात 230 मते पडली. यामुळे लोकसभेत विधेयकाच्या बाजूने सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळवण्यात मोदी सरकारला अपयश आले. परिणामी विधेयक मंजूर होऊ शकले नाही. हेही वाचा : Air Pollution : नदी स्वच्छ की हवेत विष? पुनावळ्यात जलपर्णीच्या ढिगाऱ्याला आग; संपूर्ण परिसर धुराच्या विळख्यात