पुणेः काल रात्री उशिरा जिह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व मिळाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री झाले आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे आणि बीड अशा दोन जिल्ह्यांच्या पालकत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांना मात्र पालकमंत्री करण्यात आलेले नाही. यामुळे मंत्र्यांकडून नाराजीचा सूर आवळाला जात आहे.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर मंत्री अदित्य तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. यामुळे मंत्री भरत गोगावले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरील निर्णय धक्कादायक असल्याचे गोगावले म्हणाले आहेत. तसेच भरत गोगावले यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी जोरदार राडा केला आहे. एकीकडे तटकरे समर्थकांकडून जल्लोष साजरा केला जात होता, तर दुसरीकडे शनिवारी रात्री गोगावले समर्थकांनी काही काळासाठी आंदोलन करीत महामार्ग रोखून धरला होता.
पालकमंत्री पदाच्या निर्णयावर मंत्री भरत गोगावले यांनी आपली नाराजी व्यक्त करीत रायगडमधील सहा आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून जिल्ह्यातील वातावरणाबाबत माहिती दिली होती. आत्ता जो निकाल आहे तो अनपेक्षित आणि मनाला पटणारा नाही, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली आहे. मात्र, आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे देखील गोगावले यांनी सांगितले.
समर्थकांनी महामार्ग धरला रोखून
शनिवारी रात्री मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी आपली नाराजी व्यक्त करीत गोगावले यांचा जयजयकार करीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे दोन तास गोगावले समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला होता. तसेच टायर देखील जाळण्यात आले होते.