लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकाचे लोकार्पण
कोल्हापूर(प्रतिनिधी) – नव्या पिढीला आधुनिकतेचा विचार जाईल. समतेचा विचार जाईल. लोकशाहीचे महत्व समजेल आणि विकासाच्या कामासाठी वेगवेगळ्या पध्दतीनी शैक्षणिक भूमिका स्वीकारुन पुढे कसे जायचे, यशस्वी कसे व्हायचे, या प्रेरणा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाच्या माध्यमातून मिळतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज झाला. या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, देशात अनेक राजे आणि संस्थांनेही झाली. समाजाचं स्वत्वं गेले होते ते स्वत्वं जागे करुन समाजाला संघटीत करुन, राज्य प्रस्थापित करण्याची कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. हातात आलेले राज्य समाजातील शोषित, पीडित, वंचित घटकांना उभे करण्यासाठी वापरायचे हे सूत्र ठेवून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा राज्य कारभार केला. उपेक्षिताला सामान्य माणसाला लाभ देण्यासाठी 50 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला.
कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा क्षेत्रात समाजातील कलावंतांना प्रोत्साहन देवून पुढे आणण्याचे काम त्यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मदत करुन देशाला दिशा देणाऱ्या विचारवंताला त्यांनी पुढे आणले. त्यांनी लिहीलेल्या घटनेची चौकट लोकशाहीसाठी महत्वाची आहे. नव्या पिढीला हे स्मारक समतेचा विचार आणि विकासाची दृष्टी देण्याची प्रेरणा निश्चित देईल, असेही ते शेवटी म्हणाले.
थोरात म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे हे समाधी स्मारक 100 वर्षांपेक्षा जास्त मानवतेला समतेचा संदेश देणार आहे. सर्व सामान्यांची ही गादी आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाचा कायदा केला. त्याच विचारावर राज्य शासनाने पुढे आणखी 10 वर्षे हे आरक्षण वाढविले आहे. विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, समानतेचा संदेश केवळ निर्णय न घेता प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि संतांचे विचार पुढे नेण्याचं समर्थ काम राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे, असे त्यांनी सांगितले.