नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच काही नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करताना पहायला मिळत आहे. अशीच एक टीका पश्चिम बंगालमध्ये सध्या चर्चेचे कारण बनली आहे. बंगालमधील भाजपाचे खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत तृणमूल काँग्रेस आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये टीएमसीचे खासदार पत्रकार परिषदेत पार्टीच्या एका महिला आमदाराचे गाल सर्वांसमोर ओढताना दिसत आहेत.
दरम्यान, हा व्हिडिओ कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, यामध्ये दिसणारी व्यक्ती टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी असल्याचा दावा लॉकेट चॅटर्जी यांनी केला आहे. लॉकेट चॅटर्जी यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की, “टीएमसी महिलांचे सबलीकरण करीत आहे, हे टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि बंकुराच्या महिला आमदार आहेत, ज्या तिकीट न मिळाल्यामुळे नाराज आहेत. लाज वाटली पाहिजे.”
हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केल्यानंतर भाजपाने तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यासंदर्भात भाजपाने म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये गेल्या दहा वर्षांत बलात्कार, विनयभंग यासारख्या महिलांच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली नाही. राज्यातील महिलांवरील गुन्हेगारीची आकडेवारीसुद्धा राज्यातील ममता सरकारने एनसीआरबीला दिली नाही. त्यामुळे सविस्तर अहवालही तयार केलेला नाही.
दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने यंदा 50 महिलांना उमेदवारी दिली आहे. अलीकडेच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही महिला सुरक्षा आणि महागाई संदर्भात कोलकाता येथे एक रॅली काढली होती. या रॅलीत त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने महिला दिसून आल्या होत्या.