मला विरोधकांना हेच सांगायचंय की….; रोहित पवारांनी सुनावले

मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील गंभीर करोना स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर आज रात्री आठ वाजेपासून राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यावर आता विरोधकांकडून टीका करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई-पुणे याव्यतिरिक्तही महाराष्ट्र आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. सरकारने जाहीर केलेले पॅकेज ही निव्वळ धूळफेक असल्याचेही ते म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे विरोधकांना सुनावले आहे.

मला विरोधकांनाही सांगायचंय की ही वेळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची नसून एकत्रितपणे संकटाचा मुकाबला करण्याची आहे. ही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

काय आहे रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट?

केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्राव्यतिरिक्त छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब, बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरयाणा, बिहार आदी राज्यांमध्येही कोरोनाचं संकट भीषण असल्याचं दिसून येतं.

वरील राज्यांपैकी सहा राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे त्यामुळे भाजपशासित राज्यांमधील कोरोना व्यवस्थापन खूपच चांगलं असल्याने तिथं कोरोना येत नाही हा विरोधकांचा दावा फोल ठरतो.

आज जेंव्हा मी भाजपच्या नेत्यांना मीडियाशी बोलतांना पाहतो तेंव्हा ते महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीवरुन राजकारण करणं थांबवत नाहीयेत हे दुर्दैवी वाटतं. आज राजकारणाची वेळ नसतानाही महाराष्ट्रातील सरकार असमर्थ आहे, इथली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली अशाप्रकारची विधानं विरोधकांकडून केली जात आहेत.

आज देशभरातील सर्वच राज्य सरकार आर्थिक अचणीतून जात आहेत. एकीकडं उत्पन्न खुंटलंय तर दुसरीकडं केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेला हक्काचा निधी मिळत नाहीय. केंद्र सरकारकडं उत्पन्नाचे स्त्रोत अधिक असल्याने स्वाभाविकपणे केंद्राने या सर्व परिस्थितीत जास्तीची जबाबदारी घेणं अपेक्षित आहे पण तसं होताना दिसत नाही.

जगभरात करोनाची एका नंतर दुसरी लाट येते हे अनुभव सर्वांना होता. त्याप्रमाणे ती भारतातही येणार हे नक्की होतं मात्र तरीही केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यात जवळपास १०० देशांमध्ये ११ लाख रेमेडेसिवीर औषधाची निर्यात केली. वास्तविक आपल्यासाठी आवश्यक तेवढा साठा झाल्यानंतरच निर्यात करणं अपेक्षित होतं.

मला आजच्या परिस्थितीबाबत कोणाला दोष द्यायचा नाहीय किंवा या मुद्याचं राजकारणही करायचं नाहीय. मला विरोधकांनाही हेच सांगायचंय की ही वेळ एकमेकांची उणी-दुणी काढण्याची नसून एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करण्याची आहे. हे संकट वेगळं आहे. ही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची आहे.

आमच्या विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे कोरोना हा केवळ एखाद्याच राज्यात वाढत नसून तो सगळीकडेच वाढतोय. आज या कठीण काळात सगळ्या यंत्रणेचा कस लागतोय. आज ही स्थिती हाताळणारी प्रत्येक सरकारी यंत्रणा मग ते पोलीस असोत की आरोग्य कर्मचारी असोत की अत्यावश्यक सेवा पुरवणारी यंत्रणा असो ही प्रत्येक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येक माणूस पूर्ण क्षमतेने या परिस्थितीला सामोरा जात आहे. अशा परिस्थितीत आपण भांडत बसलो तर त्यात नुकसानच अधिक होणार आहे.

आज राज्य, विभाग, प्रदेश सोडून एक देश म्हणून आपल्याला उभं राहावं लागेल आणि या संकटावर मात करावी लागेल. मानवतेच्या मुळावर उठलेल्या या संकटाचा सर्वांनी एकत्रितपणे मुकाबला करून संपूर्ण जगाला एक वेगळा संदेश आपल्याला देता येईल. त्याची हीच वेळ आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करुयात आणि कोरोनाच्या संकटाला थोपवूयात!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.