ऑनलाइन अभ्यास करा : जेईई, नीट आणि सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला
पुणे – इयत्ता बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विविध प्रवेश पूर्व परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी खासगी कोचिंग क्लासकडून मिळणारे मार्गदर्शन बंद झाले आहे. मात्र, विविध संकेतस्थळांवरुन जेईई, नीट आणि सीईटी परीक्षांची तयारी करता येऊ शकते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा लॉकडाउननंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ न दडवता ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी घर बसल्या स्वयंअध्ययनाने आपला अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. विद्यार्थ्यांनी ऑनलाइनचा पर्याय निवडावा, असा सल्ला शिक्षण तज्ज्ञांनी दिला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांना सध्या सुट्टी आहे. त्याचप्रमाणे विविध खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी घरी बसून काम करत आहेत.
या सर्वांसाठी नावीन्यपूर्ण ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ऑनलाइन व्हिडिओ पाहून त्यावरील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यावे लागतात. काही कृतीयुक्त प्रश्न असतात. त्यामुळे डोक्याला चालना देऊन विद्यार्थ्यांनी विविध ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावेत, असे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
सध्या घरी बसून कंटाळा येत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेत आहेत. इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा संपले आहेत.
त्याचप्रमाणे जेईई, नीट,सीईटी या प्रवेश पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा लांबणीवर पडले आहे. अशा स्थितीत मात्र केवळ वर्गात बसूनच शिक्षण घेता येते असे नाही. माहिती तंत्रज्ञानामुळे घरबसल्या विविध अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
तज्ज्ञ म्हणतात…
देशातील शास्त्रज्ञ करोनावर उपाय शोधतील. मात्र, घरी बसून विद्यार्थ्यांनी सुद्धा आपला वेळ वाया घालवू नये. मूकसह विविध ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून नवनवीन कौशल्य विकसित करणारे आणि स्वतःला सक्षम करणारे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन अभ्यासक्रमांचा विचार करणे योग्य ठरेल, याकडे शिक्षतज्ज्ञ यांनी लक्ष वेधले आहे.
काही मोफत ऑनलाइन कोर्सेस
यामध्ये केंद्र शासनाच्या स्वयंम् पोर्टल सह मॅसिव ओपन ऑनलाइन कोर्स (मूक), यूडीएसिटी, खान अकॅडमी, स्किल शेअर, टीईडी ईडी, ओपन एज्यु. अशा विविध संकेतस्थळांवर मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यात प्रोग्रामिंग, बिजनेस, मॅनेजमेंट, कम्युनिकेशन, लाईफ सायन्सेस, इंजिनियरिंग आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम आहेत.