मुंबई – मनसेला आलेली मरगळ झटकण्यासाठी आणि पक्ष संघटन पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी पक्षाचे महाअधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात राज ठाकरे अनेक मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. या महाअधिवेशनात मनसेमध्ये इनकमिंग सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनाही मनसेत सामील होण्याची भावनिक साद महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी घातली आहे.
अमेय खोपकर यांनी म्हंटले कि, पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी.. पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका… निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ. मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा, असे ट्विट त्यांनी केले आहे.
पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी..
पण सच्च्या कार्यकर्त्यांनो,बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका…
निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ
मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ
बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 22, 2020
दरम्यान, मनसेचा चौरंगी झेंडा आता बदलणार आहे. आत्तापर्यंत मनसेच्या अजेंड्यावर मराठीच्या मुद्य अग्रभागी होता. आता त्याचसोबतच मनसे हिंदुत्वाचा मुद्दाही आक्रमकपणे लावू धरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 23 जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन मुंबईत होत असून त्यात राज ठाकरे पक्षाचे नवीन धोरण जाहीर करणार आहेत. मनसेच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार असून मनसेला हा बदल यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.