…हे पाप पवारांचेच – मुख्यमंत्री

अकोलाः सध्या राज्यात निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहचली असून, राजकीय मंडळींच्या सभांनी राज्य ढवळून निघाले आहे. या प्रचार सभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या तोफा डागण्याच काम सध्या जोरात सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अकोला जिल्यात प्रचारासाठी गेलेले आहेत. यावेळी घेण्यात आलेल्या सभेत फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी आत्महत्यांवर बोलताना त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की, पवारसाहेब विदर्भामध्ये फिरतायत. शेतकरी आत्महत्या होतायत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कोणाच्या राज्यामध्ये सुरू झाल्या, शेतकरी आत्महत्या हे पाप तुमचं आहे, कारण या शेतकऱ्याच्या शेतीला तुम्ही पाणी पोहोचू दिलं नाही. तुमचे याठिकाणी मंत्री होते, तुम्ही केंद्रात कृषिमंत्री होतात. 15 वर्षं तुमचं सरकार होतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, विदर्भाच्या हिश्श्याचा पैसा भ्रष्टाचारामध्ये तुम्ही पळवला आहे. तुम्ही हा पैसा तुमच्या तिजोऱ्यांमध्ये नेला. पुढच्या दोन ते अडीच वर्षांत सिंचनाची सर्व कामे आम्ही पूर्ण करू, एकाही शेतकऱ्यांनं आत्महत्या केली, तर रात्रभर आम्ही झोपू शकत नाही. हे पाप तुमचं आहे, तुमच्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रावर लादलं गेलं आहे. देशात 10 वर्ष कृषिमंत्री राहिल्यानंतर कुठल्या तोंडानं सांगता शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायत, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर केली आहे.

तसेच राष्ट्रवादीची अवस्था फारच बिकट आहे. त्यांच्या पक्षात कोणी राहायला तयार नाही. आधे उदर जाओ आणि आधे उदर जाओ, कोणी बचे तो मेरे पिछे आओ, अशा प्रकारची अवस्था पवार साहेबांच्या पक्षाची झाली आहे असही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.