संजय राठोड यांच्यासंदर्भात भाजपकडून गलिच्छ राजकारण : उद्धव ठाकरे

मुंबई  – संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर पटलवार केला आहे. राजीनामा घेणे, गुन्हा दाखल करुन मोकळे होणे म्हणजे न्याय देणे नव्हे. या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणाने व्हावा ही भूमिका आमची आहे. जे तपासातून समोर येईल त्यानुसार कारवाई होईल, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच भाजपकडून राज्यात गलिच्छ राजकारण सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, न्यायाने वागणं ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे म्हणून काम केले जात आहे. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे, असे म्हटले जात आहे. मात्र, तसं होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिला आहे.

ज्या वेळेस घटना घडली त्याच वेळेस तपासाच्या सुचना दिल्या आहेत. कालबाह्य तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश, कुणालाही पाठिशी घालणार नाही. नुसती आदळआपट करण्याचा प्रघात योग्य नाही. तुमच्या काळातही हिच तपास यंत्रणा असल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करुन दिली.

विरोधी पक्ष दुतोंडी
करोना काळात भ्रष्टाचाराचा आरोप खोटा आहे. धारावी पॅटर्नचे जागतिक पातळीवर कौतुक झाले आहे. सरकारचं सोडा पण तुम्ही कोविड यौद्‌ध्यांची थट्टा करत आहात. असा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्राने कधी अनुभवला नाही. इतरही काही आरोप केलेत त्या सर्वाची उत्तरं देणार नाही. सावरकरांची जयंती की पुण्यतिथी हे आधी त्यांनी ठरवावे. कर्नाटकात तुम्ही आहात, खाली वर तुम्ही आहात सीमाप्रश्न का सोडवला नाही, असाही सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहजतेने संजय राठोड यांचा राजीनामा घेतलेला नाही. विरोधी पक्षात असलेल्या भाजपाच्या दबावामुळे राजीनामा घ्यावा लागला आहे. शिवसेना बलात्कार करणाऱ्यांना, खून करणाऱ्यांना पाठिशी घालत आहे. या प्रकरणात एफआयआर दाखल करुन, संजय राठोड यांना अटक झाली पाहिजे.
– खासदार नारायण राणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.