मोदी, भाजपा सरकारला हटविण्याची हीच योग्य वेळ – पार्थ पवार

पिंपरी – मागील लोकसभेला मोदींची लाट होती, त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी मोदी काहीतरी करतील या आशेवर मते दिली होती. मात्र मागील पाच वर्षांत पश्‍चाताप करण्याची वेळ सर्व सामान्य नागरिकांवर आली आहे. त्यामुळे आता पुन्हा परिवर्तन घडवून भाजपा सरकारला हटविण्याची हीच योग्य वेळ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी कर्जत येथे आयोजित केलेल्या संवाद सभेत केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज कर्जतमध्ये विविध ठिकाणी सभा घेतल्या. यावेळी कर्जत मधील नागरिकांनी पार्थ पवार यांना निवडून आणण्याचे आश्वासन दिले. यावेळी म्हाडाचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, कर्जतचे आमदार सुरेशभाऊ लाड, मावळ लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक उमेश पाटील, जि.प. समाज कल्याण सभापती नारायण डामसे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पुढे बोलताना पार्थ पवार म्हणाले की, मागील दहा वर्षे शिवसेनेचे खासदार या मावळ लोकसभेचे नेतृत्व करत आहेत. मात्र ज्या झपाट्याने मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास करणे गरजेचे होते, तो झाला नाही. कर्जत भागात रेल्वेचा मोठा प्रश्‍न आहे. तो मागील दहा वर्षांत खासदार सोडवू शकले नाहीत. रेडझोन, पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. या मतदार संघातील प्रश्‍न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असून आपण संधी दिल्यास मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यात आपण कमी पडणार नसल्याचेही पार्थ पवार यावेळी म्हणाले.

सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव म्हणाले, मागच्या पाच वर्षात भाजपा सरकारने केवळ लोकांना वेड बनविण्याचे काम केले आहे. सर्वात जास्त घोटाळे हे भाजपा सरकारच्या काळात झाले आहेत. राफेल घोटाळा हा त्यातलाच एक मोठा घोटाळा आहे. त्यामुळे आता परिवर्तन करण्याची गरज आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.