हा तर कोरोनाचा उद्रेकच! कोरोनाबाधितांच्या संख्येने मोडले सर्व विक्रम; २४ तासांत तब्बल ‘एवढी’ वाढ

एकाच दिवसात चार लाख नव्या रुग्णांची भर तर 3523 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात अक्षरश:उद्रेकच झाला आहे. कारण दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकड्यांचा नकोसा विक्रम पाहायला मिळत आहे. दरम्यान आता कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने देशात मागील २४ तासांत आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. देशात पहिल्यांदा एकाच दिवसात कोरोनाचे ४ लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही धडकी भरवणारी आकडेवारी जारी केली आहे.

गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १ हजार ९९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ३ हजार ५२३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ लाख ९९ हजार ९८८ इतकी आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी १ कोटी ५६ लाख ८४ हजार ४०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २ लाख ११ हजार जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला देशात ३२ लाख ६८ हजार ७१० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाची लागण होणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड मोठा ताण आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

एप्रिलमध्ये कोरोनाने देशात वेगाने हातपाय पसरले आहेत. ५ एप्रिलला देशात पहिल्यांदा कोरोनाचे एक लाख रुग्ण आढळले. त्यानंतर हा आकडा सातत्याने वाढत गेला. १५ एप्रिलला देशात प्रथमच २ लाख रुग्णांची नोंद झाली. २२ एप्रिलला देशात पहिल्यांदाच ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. यानंतर आज म्हणजेच १ मे रोजी देशात ४ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्ण वाढीचा वेग अक्षरश: धडकी भरवणारा आहे. मे महिन्याच्या मध्यात देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.