…हेच ते ‘डॉक्‍टर रूपातील देव’

करोनाग्रस्तांना जीवदान देण्यासाठी दिवस-रात्र झटणाऱ्यांना सलाम

– सागर येवले

पुणे – करोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर तो काही दिवसांतच पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद यासह राज्यात पसरला. या विषाणूने एवढे थैमान घातले, की शहरे, मंदिरांचे दरवाजे बंद झाले. आज संपूर्ण देश बंद करण्याची वेळ आली आहे. अशा भयंकर परिस्थितीत केवळ एक दरवाजा उघडा आहे, तो म्हणजे “डॉक्‍टरां’चा.

सध्या करोनाबाधितांना जीवनदान देण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे नायडू आणि ससून रूग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचारी दिवस-रात्र रूग्णांची काळजी घेऊन उपचार करत आहे. त्यांची तळमळ, कष्ट पाहिल्यावर बंद झालेल्या मंदिरातील “सर्व देव डॉक्‍टरांच्या रुपाने उपचार देत आहेत’ असे वाटते.

डॉक्‍टर म्हणजे रुग्णांची लूट करून स्वत:चे खिशे भरणारे आणि इमारती उभारणारे, असा समज आज सर्वत्र पसरलेला आहे. पण, बहुतांश डॉक्‍टर हे आजही सेवाभावी वृत्तीनेच आणि देवाचा अवतार असल्यारखे उपचारासाठी धावून येतात. हीच परिस्थिती सध्या पुणे शहरातील नायडू रुग्णालयात आहे.
चीनमध्ये करोनाचा उद्रेक सुरू झाला तसे भारतासह अन्य देशांनी त्यांची यंत्रणा उभारत हा विषाणू आपल्या देशात येऊ नये, यासाठी कशोसीने प्रयत्न केले. मात्र, “व्हायचे ते झालेच’ आणि भारतात करोना दाखल झाला. तेव्हापासून पुणे शहरात खबरदारी म्हणून परदेशातून आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठी पहिल्या दिवसांपासून नायडू रुग्णालयात यंत्रणा उभारण्यात आली.

दि. 9 मार्च रोजी पुण्यात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्याला तत्काळ नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत नायडू रूग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. या विषाणूपासून आपल्याला धोका आहे, हे माहिती असतानाही बाधित रुग्णांना उपचार देणे, त्यांना बरे करणे हेच आपले कर्तव्य आहे.

याची जाणीव मनात ठेवून मागील 25 दिवस येथील डॉक्‍टर मेहनत करत आहे. त्यांच्या या कार्याला खरेच “सलाम. त्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्‍टरांचीही साथ मिळत आहे. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली 25 डॉक्‍टर, 60 परिचारिका आणि कर्मचारी असे एकूण 150 व्यक्ती याठिकाणी बाधित, संशयितांवर उपचार करत आहेत, असे प्रशासनाने सांगितले.

अगदी आईप्रमाणे बाधितांची काळजी
रुग्णालयात येणाऱ्या संशयित व्यक्तींची सर्व माहिती लिहून घेणे. त्यांचे घश्‍यातील स्राव नमुने घेऊन ते एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवणे. तोपर्यंत या व्यक्तींना विलगीकरण कक्षात दाखल करून, त्यांना काय त्रास होत असेल तर उपचार देणे. हे प्राथमिक काम डॉक्‍टर आणि परिचारिका करत आहे. ज्या व्यक्तीचा नमुना अहवाल पॉझिटिव्ह येईल, त्याला आयसीयूमध्ये ठेवून दिवस-रात्र घड्याळाच्या काट्याकडे लक्ष देऊन वेळच्यावेळी औषध देणे, जशी एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते, तसेच येथील परिचारिका आणि कर्मचारी रुग्णांचा सांभाळ करत आहेत. तर शहरासह जिल्ह्यात या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनही झोप विसरून काम करत आहे. या सर्वांच्या कार्याला “प्रभात’चा सलाम.

Leave A Reply

Your email address will not be published.