ज्याच्याकडे संयम नाही, त्याचा हा मार्ग नव्हे! (भाग-1)

मागील सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचीमानसिकता बदलताना आढळतीय, खासकरून मे २०१९ नंतर. सर्वच जण म्हणजे तेजीवाले व मंदीवाले दोघांचाही संयम कमी झालेला वाटतोय. त्याचं कारण देखील तसंच आहे. निवडणुकीनंतर तेच सरकार स्थिरावल्यास बाजारात तेजी येईल या प्रकारच्या भल्या मोठ्या अपेक्षा बाळगणारे गुंतवणूकदार आणि कोल्ह्याला द्राक्षं आंबट या मानसिकतेनुसार दीर्घ मुदतीस हळूहळू मुरड घालत बनलेले ट्रेडर्स अशा दोन्ही मानसिकता गेल्या कांही महिन्यांत अनुभवायला मिळाल्या. कांही लोक युट्यूबवरील सल्ले अमलात आणून म्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणूक नुसतीच बंद न करता त्यातील रक्कम काढून घेऊन पळत्याच्या मागं लागायचं (सोन्यामध्ये गुंतवणूक) असं मनाशी ठरवताना दिसत आहेत. एकूणच काय तर अगदीच बोली भाषेत सांगायचं झालं तर पट्टीचे गुंतवणूकदार देखील भंजाळलेत. याच्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न केल्यास अगदी प्रमुख कारण असं आढळून येईल की संयमाची कमतरता कारण ती निर्माण करणारे सतराशेसाठ उपलब्ध पर्याय. नक्कीच, उत्तम संपत्ती व्यवस्थापन हे वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करूनच साध्य होत असतं हे जरी खरं असलं तरी त्यासाठी देखील कांही अगदी मूलभूत गृहीतकं असावीत.

ज्याच्याकडे संयम नाही, त्याचा हा मार्ग नव्हे! (भाग-2)

पहिल्यांदा गरज आहे ती आपण स्वतःच्या गुंतवणुकीपेक्षाही स्वतःच्या मानसिकतेस सुरक्षित करण्याची. मागील आठवड्यात माझ्याकडं निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या दोन व्यक्ती शेअर बाजारात नव्यानं गुंतवणूक करण्यासाठी आल्या, अर्थातच वेगवेगळ्या नियोजित वेळी. सिद्धांत, वय १९ आणि अमितकुमार वय ४३. दोघांचीही पार्श्वभूमी व जुजबी माहिती विचारून झाल्यावर त्यांना मी एकच प्रश्न विचारला, “शेअर बाजारात तुम्ही गुंतवू इच्छित असलेल्या रकमेपैकी किती टक्के रक्कम तुमची गमावण्याची तयारी आहे ? याची उत्तरं निश्चितच वेगवेगळी होती. सिद्धांतचं उत्तर होतं शंभर टक्के तर अमितजींचं उत्तर होतं फारतर ३०-४०%. परंतु माझ्याकडं असे देखील लोक येऊन गेलेत की ज्यांची याच प्रश्नावर उत्तरं असतात, ‘शून्य’. म्हणजे असे लोक मनात ठाम गृहीतकं करूनच येतात की शेअर बाजार ही जादूची कांडी आहे आणि यातून काहीही न गमावता केवळ नफाच पदरात पडून घेता येतो आणि तो ही रोज ३-४% (‘लावलेल्या’ भांडवलाच्या), म्हणजे महिन्याकाठी ८०%. अशा महाभागांना मला एकच सांगावंसं वाटतं, जर अशाप्रकारे बाजारातून नफा कमावता आला असता तर कोणीही इतर कामधंदा केलाच नसता. आता अशा प्रकारच्यापरताव्याची अपेक्षा ठेवण्याचं धाडस कुठून येतं तर काही चुकीच्या जाहिरातींमुळं. मात्र अशा चुकीच्या गोष्टींमुळं अनेक लोकांचं भांडवल जातंच जातं मात्र शेअरबाजाराचं नांव देखील खराब होतं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here