महापालिका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ
पुणे – “जम्बो रुग्णालय बांधण्याचा निर्णय हा पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने पैसे खर्च करण्याला विरोध करणे म्हणजे सत्ताधाऱ्यांना पुणेकरांविषयी गांभीर्य नाही, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे राजकारण करण्याची ही वेळ नाही. त्यामुळे रुग्णालय उभारणीसाठी मदत द्यावी,’ अशी सूचना महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी सत्ताधाऱ्यांना केली आहे.
भाजपने करोनाविषयक नियोजन गांभीर्याने घेतले नाही, त्यामुळे अनेक पुणेकरांना जीव गमवावा लागला. महापालिका स्तरावर वेळोवेळी करोनाविषयक उपाययोजनांबाबत पत्रव्यवहार करून, तोंडी सूचना करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे. विरोधकांनी ऑक्सिजन बेडसाठी सव्वादोन कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच सभासदांच्या “स’ यादीतून दहा टक्के निधी करोना विषयक कामासाठी पूर्वीच दिलेला आहे. सत्ताधाऱ्यांनी मात्र आपला निधी पंतप्रधान निधीला द्यायचा आणि पुणेकरांसाठीच्या उपाययोजनेवेळी राज्य सरकारला दोष द्यायचा, हे चुकीचे आहे असे धुमाळ यांचे म्हणणे आहे.
आपत्कालिन स्थितीत निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना असून त्यांनी या रुग्णालय उभारण्याच्या निर्णयाची कार्यवाही करावी, असे पत्र धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.
विरोधी पक्षनेत्या करणार प्लाझ्मादान
करोनावर मात करून बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान केल्यास गंभीर रुग्णांचा जीव वाचविणे शक्य होत आहे. त्यामुळे सामाजिक बांधीलकी लक्षात घेऊन महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि त्यांचे पती प्रदीप धुमाळ यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, त्यांनी विभागीय आयुक्तांना पत्र दिले आहे. करोनावर कुठलेही रामबाण औषध निघाले नसले, तरी करोनाबाधित व्यक्ती 28 दिवसांनंतर कोणत्याही लक्षणाशिवाय राहिल्यास त्याचा प्लाझ्मा दुसऱ्या बाधित रुग्णाला देता येतो. त्यामुळे करोनामुक्त व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन प्रशासनाने यापूर्वी अनेकदा केले आहे.
या आवाहनास प्रतिसाद देत दीपाली धुमाळ, प्रदीप धुमाळ आणि त्यांचा मुलगा मनीष यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मा दान करण्यास तयार असल्याचे पत्र दिले आहे. शहरातील करोनामुक्त नागरिकांनी या उपक्रमासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.