“ही’ कोथरूडची संस्कृती नाही

महायुतीचे चंद्रकांत पाटील यांचे विरोधकांच्या टीकेला उत्तर

पुणे – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी अतिशय खालच्या दर्जाची टीका केली. विरोधकांनी केलेली कमरेखालील टीकादेखील मी सहन केली. त्याला प्रत्युत्तर दिले नाही. कोथरूडकरांची आणि पुण्याची संस्कृती मी जाणतो. विरोधकांनी कोणत्याही थराला जाऊन टीका केली आहे.

कोथरूड आणि पुण्याच्या विकासासाठीची कटिबद्धता हेच माझे या टीकेला उत्तर असेल, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. या निवडणुकीदरम्यान विरोधकांनी विविध दूषणांनी आणि त्यांच्या नावाचा “शॉर्टफॉर्म’ करून खिल्ली उडवली. तसेच गाण्याचे विडंबन करूनही विरोधी प्रचार केला. त्यामुळे उमेदवारांनी हा खालच्या दर्जाचा प्रचार केला असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. आपण मात्र विकास कामातूनच त्याला उत्तर देऊ असे पाटील यांनी म्हटले आहे.

 कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पराभव आधीच मान्य केलाय
या निवडणुकीतही ईव्हीएमवर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळेच ईव्हीएम ज्याठिकाणी ठेवण्यात येतील किंवा आताही ठेवली आहेत त्या खोलीत जॅमर बसवण्यात यावेत, अशी मागणी बहुतांश विरोधकांनी केली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. यामागणीला भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडमधील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. ईव्हीएम ठेवलेल्या परिसरात जॅमर लावण्यासाठी आमची काहीच हरकत नाही. मात्र, याचा अर्थ स्पष्ट आहे, कॉंग्रेस राष्ट्रवादीसह विरोधकांनी आपला पराभव मान्य केला आहे आणि आता ते मतदानापूर्वी पराभवाची कारणे शोधू लागले आहेत, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षांना उत्तर दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.