…हे येड्या-गबाळ्याचे काम नाही

आमदार दत्तात्रय भरणे : इंदापूर आयटीआय संस्थेत वर्गखोल्यांचे भूमिपूजन

रेडा – इंदापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वर्गखोल्या फक्‍त पाच होत्या. परंतु आणखी अठरा वर्गखोल्यांची नितांत गरज होती. ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यावर अवघ्या दीड महिन्यात प्रस्ताव सादर करून पाच कोटीचा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे कमी कालावधीत मोठा निधी मिळवणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही, अशी घणाघाती टीका आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.

इंदापूर शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या 18 अतिरिक्‍त वर्गखोल्या बांधकामासाठी पाच कोटी निधी आमदार भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. याचे भूमिपूजन भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

भरणे म्हणाले की, ग्रामीण भागातील आई – वडिलांना आपल्या मुलांना घडवण्यासाठी रात्रदिवस शेतात काबाडकष्ट करून घाम गाळून मेहनत करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे लागते, याची जाण आयुष्यभर विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. आपण घेत असणाऱ्या शिक्षणातून प्रगतीचा मार्ग शोधत नोकरी व आपल्या व्यवसायात प्रगल्भ होऊन उद्योजक बनले तरच आपल्या मातापित्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल. आगामी काळात येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आपला नावलौकिक निर्माण करेल.

गारटकर म्हणाले की, सध्याच्या कालावधीत तंत्रशिक्षणाचे युग सुरू आहे. भविष्याच्या दृष्टीने आयटीआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण प्रशिक्षण मिळावे. हा हेतू आमदार दत्तात्रय भरणे यांनी मनात ठेवून निधी खेचून आणला आहे. प्राचार्य लक्ष्मण अंतराल यांनी स्वागत केले.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, नगरसेवक श्रीधर बाब्रस, अनिकेत वाघ, बाळासाहेब ढवळे, धनंजय बाब्रस, सुरेश गवळी, पोपट शिंदे,स्वप्नील राऊत, गजानन गवळी, अरबाज शेख, माऊली हाके, नागनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीधर बाब्रस यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.