मुंबई – अजित पवारांनी जे काही वक्तव्य केले ते फूलस्टॉप नसून कॉमा आहे, यापुढे अजूनही काहीही होऊ शकते, असे राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाने नेते उदय सामंत यांनी म्हटले आहे. तर “शुगर वाढल्याने हे ऑपरेशन तूर्तास पुढे ढकलले गेले’, असल्याचे सूचक वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी केले आहे.
राज्यात सत्तांतर वगैरे काहीही होणार नाही, आपण राष्ट्रवादीतच असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तरीही त्यावरुन होणाऱ्या चर्चा काही थांबायच्या नाव घेत नाहीत. आता त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी भाष्य केले आहे.
झाकली मुठ सव्वा लाखाची
महाविकास आघाडीत अजित पवारांची गळचेपी होत आहे. येत्या काही दिवसांत या गोष्टी घडतील. वज्रमूठ आहे की सैल झालेली मूठ आहे हे सर्वांनी पाहिले आहे. अजित दादांनी आज अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत. त्यांचा योग्य तो मानपान केला जाईल.
शुगर वाढल्यामुळे ऑपरेशन पुढे ढकलले गेले आहे. ठाकरे गटाच्या मुखपत्रातून संजय राऊत यांनी लिहिले पण अजित पवारांनी खंडन केले नाही. त्यावरून अजितदादा नाराज आहेत हे स्पष्ट आहे. आज अजित दादांची “झाकली मूठ सव्वा लाखाची’ आहे, असेही म्हस्केंनी बोलताना पुढे म्हटले आहे.