मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाला अंमली पदार्थ रॅकेटची किनार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आता अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर येत असून, बॉलिवूडमधील या ड्रग्ज रॅकेटची आता एनसीबीकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. नुकतंच अभिनेत्री ‘रकुल प्रीत सिंह’ हिची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. तर, आज अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि साराअली खान यांची देखील चौकशी होणार आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणात बॉलिवूड कलाकरांचं व्हॉट्सऍप चॅट सतत चर्चेत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोनचं हे समोर आलेलं चॅट 2017 मधलं आहे. दीपिकाने ड्रग्ज चॅट डिलीट केल्यानंतरही, अनेक वर्षांपूर्वीचं चॅट आता एनसीबीकडे कसं आलं? असा सवाल उपस्थित राहतो.
व्हॉट्सऍपने दावा केला आहे की, त्यांचे सर्व चॅट एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन असतात. याचा अर्थ हे चॅट केवळ पाठवणारा आणि ज्याला पाठवलं तो वाचू शकतो. व्हॉट्सऍपही हे चॅट वाचू शकत नाही कारण चॅट कोणत्याही सर्व्हरवर सेव्ह होत नाही. परंतु सुशांतच्या मृत्यूप्रकरणी चौकशीदरम्यान लीक झालेल्या अनेक चॅटमुळे कंपनीच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन व्हॉट्सऍपच्या सर्व चॅटला प्रोटेक्ट करते. सेंडर आणि रिसिव्हरशिवाय चॅट्स कोणी वाचू शकत नाही. त्यामुळे कंपनीही मेसेज कंटेंट एक्सिस करु शकत नाही. कंपनी Operating System Manufacturers च्या संपूर्ण गाईडलाईन्स पाळतात. त्यामुळे केवळ फोन डिव्हाईसवर चॅट सेव्ह होऊ शकतात.
सुशांत राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया साहाद्वारे दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्माचं चॅट एनसीबीच्या हाती लागलं असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयाने तिच्या व्हॉट्सऍप चॅटचा बॅकअप Google Drive किंवा iCloud वर घेतला होता. त्यामुळे कदाचित हे सर्व चॅट समोर आले असतील.
दरम्यान, कोणताही बॅकअप प्लॅटफॉर्म, व्हॉट्सऍपच्या एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही. अशात जर कोणत्याही तपास यंत्रणेने त्या फोनचा डेटा दुसऱ्या कोणत्याही डिव्हाईसवर कॉपी केल्यास, फोन क्लोनिंगचा वापर होतो. ज्याद्वारे बॅकअप चॅट सहजपणे वाचले जाऊ शकतात.