मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने त्याच्या मुंबईतीली एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केले गेले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेनेच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड केली.
तसेच कामराविरुद्ध मुंबईतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. पहिल्यांदात शिंदे गटाच्या तोडफोड करणाऱ्या सगळ्यांवर एफआयआर झाला पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. पहिल्यांदात शिंदे गटाच्या तोडफोड करणाऱ्या सगळ्यांवर एफआयआर झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, कुणाल कामरा जे म्हणाले ते जर आवडले नसेल तर त्यांच्या विरुद्ध कायद्याने लढणे अपेक्षित आहे.
पण स्वतः सत्तेत असताना कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिवीगाळ करणे, तोडफोड करणे ह्याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, जी आपल्याला दिसली. कामरावर सोडा आधी FIR हा शिंदे गटाच्या ह्या सगळ्यांवर झाला पाहिजे. त्या हॉटेलचे झालेले नुकसान सुद्धा शिंदेंनी भरून दिले पाहिजे. आपण लोकशाहीत राहतो आणि इथे कायद्याचे राज्य राहील, गुंडगिरीचे नाही, असं अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते कुणाल कामरा?
शिवसेना भाजप पक्षामधून बाहेर आली. पुढे शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. त्यानंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर आली. एका मतदाराला ९ बटन दिले. यामुळे सर्व संभ्रमात पडले. एकाने पक्ष चालू केला होता. ते खूप मोठा जिल्हा ठाणे, तिथून येतात, असा टोला कुणालने कवितेतून लगावला आहे. यांचे हे राजकारण आहे. त्यांना घराणेशाही संपवायची होती. त्यामुळे कुणाचा बाप चोरून घेतला.
आता काय रिप्लाय असेल? मी उद्या तेंडुलकरच्या मुलाला भेटू का, त्याला सांगतो चल भाई जेवण करुयात. त्याच्या वडिलांचे कौतुक करतो आणि सांगतो, भाई तुझा बाप आजपासून माझा बाप, असा मिश्किल टोला कामराने लगावला. कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. कुणाल की कमाल. जय महाराष्ट्र, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. कुणाल कामराच्या कवितेनंतर शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.