पुस्तकातील आक्षेपार्ह लेखप्रकरणी भाजपची निदर्शने
पुणे – “स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हजारो देशभक्त निर्माण केले. परंतु देशप्रेम, स्वातंत्र्यसंग्राम आणि स्वातंत्र्यवीर यांच्याबद्दल कॉंग्रेसला कोणतेही प्रेम राहिले नाही. देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करत आहे. शिवसेना सत्तेसाठी स्वातंत्र्यवीराचा अपमान सहन करत आहे, ही शोकांतिका आहे. समाज हे पाहात असून, योग्य वेळी त्यांना धडा शिकवेल,’ अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी शनिवरी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख प्रसिद्ध केल्याबद्दल मध्यप्रदेश कॉंग्रेस सेवादलाचा निषेध करण्यासाठी शहर भाजपने सारसबागेजवळील सावरकर स्मारकासमोर शनिवारी निदर्शने केली. शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, खासदार बापट यांच्या नेतृत्वाखाली आयोजित आंदोलनात महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक, राजेश पांडे, रवी अनासपुरे, शहर सरचिटणीस गणेश बिडकर, दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर, गणेश घोष हे सहभागी झाले होते.
“सावरकांचा अवमान करणे हे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. जातीजाती समाज विभागण्याचे काम कॉंग्रेसने आजपर्यंत केले आहे. आता समाजपुरुषांना विभागण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. ते कदापि यशस्वी होणार नाही,’ असे मिसाळ म्हणाल्या.
“अतिशय हीन पातळीवर जाऊन कॉंग्रेस सावरकरांचा अवमान करण्याचा प्रयत्न करत आहे तो निषेधार्ह आहे. या विरोधात देशभरात सर्वसामान्य नागरिक रस्यावर उतरत आहे. अजूनही वेळ गेलेले नाही राहुल गांधींनी देशाची माफी मागावी. सारकरांना सन्मान मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील,’ असे मोहोळ म्हणाले.