‘हे’ नगरपालिकेचे अपयश?

आळंदीकरांचा सवाल : काही केल्या करोना आटोक्यात येईना ; इंद्रायणी घाटावर अस्थी विसर्जन व दशक्रिया विधीसाठी गर्दी

आळंदी – आळंदी नगरपालिका प्रशासन करोना आटोक्‍यात आणण्यात अपयशी ठरत आहे. त्यातच इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जनासाठी बाहेरून येणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच विशेष म्हणजे दशक्रिया विधीही आळंदीत होत असून सकाळी सहापासून दुपारी चार वाजेपर्यंत भक्‍त पुंडलिक मंदिराजवळ व शनी मंदिरा लगत घाटावर मृतांच्या नातेवाइकांची गर्दी होत आहे. कोणतीही काळवेळ व नियम पाळले जात नसल्याने करोना कसा आटोक्यात येणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

 

 

 

सध्या देऊळ बंद असल्याने भाविकांची गर्दी नाही पण काही दिवसांत मंदिर उडतील असा आशावाद भाविकांना आहे. त्यातच यंदा आषाढी वारी चुकली आहे. आता दोन महिन्यांवर कार्तिकी वारी येवून ठेपली असून ही वारीपण चुकणार की होणार हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. त्यामुळे करोना लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न होत नसल्याने पालिका प्रशासन हतबल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अस्थी विसर्जन केल्यावर नाष्टा व जेवणासाठी नागरिक शहरात फिरत असल्याने संसर्गाची बाधा अधिक होत असूनही याकडेही पालिका प्रशासन डोळझाक करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

 

 

  • कोविड सेंटर सुरू करण्यातही अपयशी
    आळंदीत रूग्णांना उपचारासाठी 18 किलोमीटर दूर महाळूंगे, चांडोली आणि पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात जावे लागते. मात्र, पालिका प्रशासन आळंदीतील कोविड सेंटरमध्ये सुविधा व डॉक्‍टर उपलब्ध करण्यात अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे.

 

 

खरे तर गंभीर बाब आहे. आळंदी शहर वगळता इतरांच्या अस्थी विसर्जनावरील बंदीबाबत प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा करून तसा आदेश काढला जाईल.
– अंकुश जाधव,  मुख्याधिकरी,  आळंदी नगरपालिका

मुख्याधिकारी आणि इतर आरोग्य प्रशासनाची गुरुवारी (दि. 17) बैठक बोलावली आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.
– संजय तेली, प्रांताधिकरी

Leave A Reply

Your email address will not be published.