बारामती (प्रतिनिधी)
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 70 हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. या योजनेअंतर्गत गरजूंसाठी मिळणाऱ्या सबसिडीची मुदत देखील एक वर्षाकरिता वाढवली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे चालू आर्थिक वर्षात देखील अनेकांचे घरांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे त्यामुळे मंदीत देखील घर खरेदीची संधी निर्माण झाली असल्याचे मत बिल्डर्स असो ऑफ इंडिया बारामती सेंटरचे चेअरमन दीपक काटे यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीतील व्यवसायांना हातभार लावण्यासाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज नुकतेच जाहीर केले आहे. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच सर्वसामान्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 70 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले आहे. बांधकाम व्यवसायिक संघटनांनी केलेल्या मागण्या काही प्रमाणात मान्य केल्या आहेत . त्यानुसार रेरा मान्यतेनुसार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळणारे 2लाख 67 हजार रुपयांच्या सबसिडी ला देखील 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीआहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या आर्थिक मंदीत देखील घरे घेण्याची संधी उपलब्ध झालीआहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा परिणाम रिअल इस्टेटवर जाणवत आहे. त्यामुळे घरांच्या किमती कमी होतील असे अनेकांना वाटत आहे. मात्र घरांचे दर कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. लॉकडाऊन परिस्थितीमध्ये देखील मागणी कमी असताना स्टील, सिमेंट तसेच इतर बांधकाम साहित्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मजुरांचे स्थलांतर झाले आहे त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे प्रकल्प खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
केंद्र सरकारच्या आर्थिक तरतुदीमुळे चालू आर्थिक वर्षात मोठ्या तसेच छोट्या स्वरूपातील घरे खरेदी करण्याची संधी निर्माण झाली आहे असे मत बिल्डर्स असो ऑफ इंडिया बारामती सेंटरचे चेअरमन दीपक काटे यांनी व्यक्त केले आहे.