Maratha Reservation – मराठा आरक्षणाबाबत आम्ही सरकारकडे ९ ते १० मागण्या दिल्या आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करा. त्यात कोणतीही अडवणूक करू नये. सरकारला आत्ताच संधी आहे. मला यात राजकारण करायचे नाही. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचे नाही.
पण आता तुम्ही निर्णय घेतला नाही, तर नंतर आमच्या नावाने आरडाओरड करायची नाही. तुम्हाला संधी म्हणून मी हे उपोषण करणार आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा इशारा दिला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे हे कधी आंदोलन, कधी उपोषण या मार्गाने मागण्या मांडत आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या सर्व मागण्या अद्याप शासनदरबारी मान्य न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहे.
मनोज जरांगे म्हणाले, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही राजकारण करू नये किंवा आमच्यामुळे कुणाचा फायदा होऊ नये तर आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर नंतर आमच्या नावाने तक्रार करायची नाही. आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार करताना सगेसोयऱ्यांची आपल्या व्याख्येनुसार अंमलबजावणी केली जावी, असे ते म्हणाले.
सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंट हे तिन्ही लागू करणे आवश्यक आहे. त्याशिवाय, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्येप्रमाणे होणे गरजेचे आहे. तेही आचारसंहिता लागू होण्याच्या आत. मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतही निर्णय व्हायला हवा. हे शब्द त्यांचे आहेत, त्यामुळे सरकारने याची तातडीने अंमलबजावणी करायला हवी, असे त्यांनी नमूद केले.