पुणे – बॉलीवूडमधील बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे कुटुंब सतत कोणत्या-न-कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. एवढचं नव्हे तर त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती करून घेण्यास चाहतेदेखील तितकेच उत्साहित असतात. बच्चन परिवारातील प्रत्येक सदस्याने बॉलीवूडमध्ये आपली छाप उमटवली आहे.
मात्र श्वेता बच्चन यापासून खूप दूर आहे. श्वेताला नेहमीच लिहिण्याची आवड होती. त्यामुळे तिला बॉलीवूडमध्ये फार रूची नव्हती. मात्र ती लहान असताना तिचे आई-वडील दोघेही सतत कामात असल्याने तिला त्यांना सेटवर भेटायला जावे लागायचे.
यादरम्यान, एकदा सेटवर ती खेळत असताना अमिताभ बच्चन यांच्या मेकअपरूममधील एका खुल्या सॉकेटमध्ये तिचे बोट अडकले. त्यावेळी ती प्रचंड घाबरली आणि तिने सेटवर जाणे थांबवले. याच कारणामुळे श्वेता बॉलीवूडमध्ये नाही, असे तिने मजेत बोलताना सांगितले.
एका मुलाखतीत श्वेता म्हणाली, मला अभिनय, गायन नेहमी सोपं वाटायचे. मात्र शाळेच्या दरम्यान तिने एका नाटकामध्ये भाग घेतला. त्यावेळेस तिने खुप मेहनतदेखील घेतली, तरीसुद्धा शेवटच्या सीनच्यावेळी ती संवाद विसरली.
या कारणामुळे तिचे संपूर्ण नाटक खराब झाले आणि हा खृप वाईट अनुभव होता, असे तिने सांगितले. श्वेताला बॉलीवूडमध्ये कधीच रुची नसल्यामुळे तिने स्वित्झर्लंडला आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भारतात येऊन पत्रकार म्हणून काम केले. तसेच श्वेताला फॅशनची आवड असल्यामुळे तिने 2006 मध्ये मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली.