शेतकऱ्यांच्या घामाची किंमत देण्याची या सरकारची लायकी नाही – शरद पवार

वातावरण भाजपच्या विरोधात असून आगामी निवडणुकीत नक्की बदल होईल

चांदवड: काँग्रेसच्या काळात शेतकरी आत्महत्या होत होत्या त्यावेळेस कुठलाही विलंब न लावता ७० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आणि व्याजदरात कपात करून पुन्हा नवीन कर्ज उपलब्ध करून दिले. या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या उत्पादनाने भारत जगात तांदूळ निर्यात करणारा एक नंबरचा देश बनला. हा त्यावेळेसच्या कर्जमाफीनंतरचा बदल होता. मात्र सध्याच्या सरकारने दिलेली कर्जमाफी ऑनलाइनच्या नावाखाली शेतकऱ्यांची केलेली फसवणूक असल्याची टीका करून सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ ३० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आणि दुसरीकडे उद्योजकांना एक लाख ३५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केल्याने शेतकऱ्यांच्या घामाची किंमत देण्याची या सरकारची लायकी नाही त्यामुळे याना पायउतार करण्याची तुमची आमची जबाबदारी असल्याचे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जे. आर. डी हायस्कूल, चांदवड येथे आयोजित दिंडोरी लोकसभा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, नुकताच देशातील सैनिकांवर काश्मीर खोऱ्यातील दहशवादी युवकांनी हा हल्ला केला. त्यानंतर लष्कराला कारवाई करण्याचा अधिकार दिला असे सरकारने सांगितले. यामध्ये हवाई दलाने कारवाई करून आतंकवाद्यांचे स्थळे उद्ध्वस्त केली. यामधून आम्ही भारतीय कुणाच्या वाटेला जात नाही जर आमच्या वाट्याला कोणी गेले तर आम्ही त्यांना सोडणार नाही, हा संदेश दिला गेला. देशाच्या ऐक्याचा ज्यावेळेस प्रश्न येतो तेव्हा पक्षभेद राजकारण बाजूला सोडून एकत्र येण्याची गरज असते. त्यादृष्टीने एकत्र येऊन सैनिकांना त्यांचा निर्णय घेण्याची मोकळीक देऊन त्यांना पाठिंबा दिला होता. आपण सैन्याच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांच्या काळात सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने नुकत्याच झालेल्या तीन राज्यातील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. ज्या राज्यात भाजपची सत्ता होती त्याच राज्यांमध्ये सरकारला सत्ता गमवावी लागली. याचा अर्थ वातावरण भाजपच्या विरोधात असून आगामी निवडणुकीत नक्की बदल होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सध्या युध्दसदृश्य परिस्थिती निर्माण केली जात असल्याची टीका त्यांनी केली.

मनमोहन सिंग सरकारच्या काळात राफेल ५६० कोटी रुपयांना खरेदी करण्याचा निर्णय झाला होता आणि त्याच्या दुरुस्तीचे काम एचएएलला देण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र भाजपने राफेल विमान साडे पंधराशे कोटी रुपयांना खरेदी केली जात आहे आणि त्याच्या दुरुस्तीचे काम एचएएलला न देता अंबानींच्या कंपनीला दिले जात आहे. एकीकडे पंतप्रधान न ‘खाऊंगा न खाने दूंगा’ अशी भाषा करतात, अशी टीका त्यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)