लंडन – कोविडच्या प्रतिबंधासाठी विकसित करण्यात येत असलेल्या लसीच्या निर्मितीमध्ये त्रुटी आढळत असून त्यामुळे या लसीच्या प्राथमिक निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले आहे. ऍस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापिठाने ही माहिती दिली आहे.
ही लस खूपच परिणामकारक असल्याचे ऍस्ट्रझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापिठाने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यानंतर लगेचच निर्मिती प्रक्रियेतील त्रुटी समोर आली आहे. या लसीच्या चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना अपेक्षेप्रमाणे पहिल्या दोन डोसमध्ये पुरेशी लस का दिली गेली नव्हती,
याचा उल्लेख ऍस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्डच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आलेला नव्हता. त्याबद्दलही शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन डोस मिळालेल्या उमेदवारांपेक्षा एकच डोस मिळालेल्या उमेदवारांची प्रकृती अधिक सुदृढ आहे.
कमी डोस दिलेल्या गटामध्ये ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले. तर दोन डोस दिलेल्या गटामध्ये ही लस 62 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले. या दोन्हीचा एकत्रित आलेख म्हणून ही लस 70 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. परंतु ज्या प्रकारे कंपन्यांनी निकाल लावला आणि अहवाल दिला त्या कारणामुळे तज्ञांचे लक्ष वेधले गेले आहे.
त्यामुळे जरी त्रुटी आढळून आली असली तरी ती वरदानच ठरण्याची शक्यता असल्याचा दावाही काही तज्ञांकडून केला जातो आहे. भारताच्या दृष्टीने आणि एकूणच जगाच्या दृष्टीने ऑक्सफर्डची लस महत्वाची आहे. त्याचे कारण त्याचे दर अत्यंत नगण्य असणार आहेत. शिवाय साठवणूक आणि वाहतूूक याकरताही फार खर्च आणि वेगळ्या सुविधांची या लशीला आवश्यकता भासणार नसल्याचे आतापर्यंत सांगण्यात आले आहे.