अबुजा – नायजेरियामध्ये गेल्या काही वर्षांपासून बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने त्यांच्या सरकारने यावर अत्यंत कठोर कायदा तराय केला आहे. यापुढे असे कृत्य करणाऱ्याला नपुंसक केले जाणार आहे. तसेच अल्पवयिन मुलीवर जर अत्याचार केला तर त्या आरोपीला फाशी दिले जाणार आहे.
बलात्काराच्या घटना होऊ नयेत, तसेच सध्याच्या कायद्यातील पळवाटांमुळे आरोपींनी लाभ होऊ नये यासाठी येथिल कदुना प्रांत सरकारने हा कायदा तयार करत त्याची तातडीने अंमलबजावणीही करणार असल्याचे जाहिर केले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये महिलांविरोधात अत्याचार वाढत असताना नायजेरिया सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे धाक निर्माण होणार असून असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही, असेही सरकारने व्यक्त केले आहे.
सध्या जगभरात करोनाचा धोका अद्याप कायम असतानाच बलात्कराच्या गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता व सरकारवरही टीका सुरु झाली होती. त्यातच कदुनामध्ये जनतेचा उद्रेक इतका प्रचंड झाला की तिथे आणीबाणी जाहीर करावी लागली.
देशात वाढत असलेल्या बलात्काराच्या प्रकरणांमुळे बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून दोषी आढळलेल्यांना नपुंसक करण्यात येणार आहे. केवळ पुरुषांसाठीच हा कायदा नसून त्यात महिला आरोपींसाठीही कठोर कायदा करण्यात आला आहे. एखाद्या महिलेने जर अल्पवयिन मुलाशी गैरकृत्य केले तर तीलाही शिक्षा होणार असून आरोपी महिलेचे गर्भाशय काढून टाकले जाणार आहे.