ही मंडळी कधीच पाणी मिळू देणार नाही – खासदार आढळराव

धामणी येथील कोपरा सभेत खासदार आढळराव यांचा इशारा
धामणी – धामणी, शिरदाळे, मांदळवाडी, केंदूर, पाबळ आदी गावांचा पाणीप्रश्‍न सुटण्याच्या स्थितीत आहे. हे काम फक्‍त युतीचे सरकारच करू शकते. त्यासाठी तुमची काळजी घेणारा, तुमच्यासाठी संघर्ष करणारा लोकप्रतिनिधी हवा. चुकून जरी राष्ट्रवादीला निवडून दिलेत तर, भविष्यात ही मंडळी तुम्हाला कधीच पाणी मिळू देणार नाही हे लक्षात ठेवा, असा इशारा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला.

शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय-शिवसंग्राम-रयतक्रांती महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शुक्रवारी (दि. 19) आपल्या प्रचारार्थ आंबेगाव तालुक्‍यातील धामणी, वडगाव पीर, मांदळवाडी, कान्हूर, चिंचोली, वरूडे, वाघाळे, पिंपरी दुमाला, गणेगाव, पिंपळे धुमाळ, हिवरे, खैरेवाडी, खैरेनगर, धामारी, मुखई जातेगाव खुर्द, जातेगाव बुद्रुक, करंदी आणि केंदूर आदी गावांचा दौरा केला. त्यावेळी धामणी येथील कोपरा सभेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, अरूण गिरे, उपजिल्हाप्रमुख रविंद्र करंजखेले, तालुकाप्रमुख सुनिल बाणखेले, भाजप तालुकाध्यक्ष संजय थोरात, लक्ष्मणराव काचोळे, अजित चव्हाण, दिलीप वाळुंज, सागर जाधव, आदी उपस्थित होते.

खासदार आढळराव म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हाळसाकांत योजनेचे गाजर दाखवून मते मिळवली. 25 वर्षे फक्‍त मंत्रीपद भोगली, पण म्हाळसाकांत योजनेचा साधा प्रस्तावही जलसंपदा विभागाकडे कधी पाठविला नाही. आम्ही पहिली बैठक घेतली तेव्हा हे समजले. किती वर्षे जनतेची फसवणूक केली यांनी. महायुतीचे सरकार आल्यानंतर जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांनी कळमोडी धरणातून बंद पाइपलाइनद्वारे धामणी, शिरदाळेसह थिटेवाडी बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या दुष्काळी गावांतील शेतीसाठी पाणी देण्यासाठी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यताही दिली असून डीपीआर बनविण्याचे काम सुरू आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, त्यांच्यासारखी बनवाबनवी करीत नाही असे त्यांनी नमूद केले.


विकासकामांचा विचार केलात तर त्यात मी कुठेही कमी पडलेलो नाही. 5 वर्षांत 14 हजार कोटींचे प्रकल्प, कामे मार्गी लावली आहेत. प्रत्येक गाव अन्‌ गाव, वाड्या-वस्त्यांवर फिरलो आहे हे जनतेला माहिती आहे. त्यांच्याजवळ मुद्दा नसल्याने राष्ट्रवादीवाले खोटे बोलून टीका करतात.
-शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.