…यामुळे टळली ‘आंबिल ओढा’ पुनरावृती

पाऊस अधिक होऊनही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात पालिका प्रशासनाला यश

पुणे – पेशवे जलाशय गतवर्षी पुर्ण भरला असल्याने त्या परिसरात झालेल्या पावसाचे पाणी थेट ओढ्यात आले. त्यातून निर्माण झालेल्या पूरस्थितीने गंभीर रूप धारण केले होते. हा प्रकार लक्षात घेत यंदा पेशवे जलाशयातून यापूर्वीच पाणी सोडण्यात आले होते. तसेच पातळी तीन मीटरने कमी राहील याची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आली. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस होऊनही यंदा आंबिल ओढ्याची पूरस्थिती आटोक्‍यात आणण्यात महापालिकेला यश आले.

मागीलवर्षी 25 सप्टेंबरला झालेल्या पावसाच्या आणि पूरस्थितीच्या हाहा:काराच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी रात्री झालेल्या पावसाने फारशी हानी झाली नाही. वास्तविक मागीलवर्षीपेक्षा यावर्षी जास्त मिमी पाऊस होऊनही फारशी हानी झाली नसल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांनी सांगितले.

बुधवारी झालेल्या पावसाने 45 ठिकाणी पाणी शिरल्याच्या घटना घडल्या असून 10 ठिकाणी झाडे पडली आहेत. मागीलवर्षी सप्टेंबर महिन्यानंतर आंबिल ओढ्यातील गाळ काढून खोलीकरण केल्याने तसेच कात्रज येथील पेशवे जलाशयातील पाण्याची पातळी कमी ठेवल्याने त्याचा उपयोग आंबिल ओढ्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यात झाला.

या तलावातील पाण्याची पातळी कमी ठेवल्याने वाहून आलेले पाणी तलावात जमा झाले, त्याचा ताण आंबिल ओढ्यावर आला नाही. त्यामुळेच तुलनेने यावर्षी पूरस्थिती कमी करण्यात आणि एकूणच आटोक्‍यात आणण्यात यश मिळाल्याचे गोयल म्हणाले.

जास्त पावसाचा इशारा आधीच मिळाल्याने महापालिकेचे सर्व उपायुक्त आणि क्षेत्रीय कार्यालयांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले होते. गुरूवारीही अधिक पावसाची शक्‍यता असल्याने अधिकची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले.

मागीलवर्षी 25 सप्टेंबरला रात्री कात्रज परिसरात 79 मि.मि. पाऊस झाला होता, काल रात्री 91 मि.मि. झाला आहे. मात्र, आंबिल ओढ्यातील गाळ काढणे, खोलीकरण करणे आणि लेकटाऊन जवळ कल्व्हर्ट केल्याने ओढ्याची वहन क्षमता वाढली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.