तगडा बंदोबस्त : गुन्हे शाखेची मोहीम, विशेष पथकासह मोठा फौजफाटा
पुणे – नववर्षाचे स्वागत करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून विशेष खबदारी घेतली जात आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे. गुन्हे शाखेच्या वतीने मागील दोन दिवसांपासूनच विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. वरिष्ठ निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली दहा पथके तयार करण्यात आली आहेत.
नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात आतुर असतात. त्यासाठी विविध पार्ट्या, संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. एवढेच नाही तर हॉटेल्स, पब यांच्याकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर दिल्या जातात. याच संधीचा फायदा घेत अमली पदार्थ तस्करांकडून तरुणांना आपल्या जाळ्यात खेचलं जाण्याची शक्यता असते, तसेच विविध प्रकारच्या सांकेतिक भाषेत “रेव’ पार्ट्याचे आयोजन देखील केले जाते. त्यामुळे पोलिसांनी अमली पदार्थविरोधी पथकाची तीन पथके नेमली आहे. पार्ट्यात मोठ्या प्रमाणत दारूचा वापर केला जातो. त्यासाठी अवैध पद्धतीने इतर ठिकाणाहून दारुची तस्करी होण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे पोलीस तस्करांसह रात्री उशिरापासून नियमबाह्य पद्धतीने सुरू असणाऱ्या पार्ट्यांवर लक्ष ठेवून राहणार आहेत.
तसेच स्थानिक पोलिसांना देखील सतर्क राहून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून खबरदारीच्या सर्व उपायोजना करण्यात आलेल्या आहेत. गर्दीचा फायदा घेत महिलांना छेडछाड व त्रास देणाऱ्या तळीरामांसाठी साध्या वेशात महिला अधिकाऱ्यांची चार पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक परिमंडळाच्या उपायुक्तांना पोलीस आयुक्त व सह पोलीस आयुक्त यांनी विशेष सूचना दिल्या आहेत.
शहरातील गर्दीची काही प्रमुख ठिकाणे कॅम्प परिसर, कल्याणीनगर, मुंढवा, फर्गसन कॉलेज रस्ता या भागांत होणारी गर्दी पाहता पोलिसांची अतिरिक्त कुमक ठेवली जाणार आहे.
नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अवैध पार्ट्या, दारूची वाहतूक करणारे, अमली पदार्थ तस्कर यांच्यावर पोलिसांची नजर असणार आहे. गुन्हे शाखेची विविध पथके शहरात तैनात करण्यात आली असून त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचे लक्ष असून महिलांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महिला पोलिसांची पथके असणार आहेत.
– अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा