पुणे, दि. 14 -पीएमपी ताफ्यातील बस ब्रेकडाऊनच्या घटनांमध्ये मागील काही महिन्यामंध्ये वाढ झाली आहे. जुलै महिन्यात ठेकेदारांच्या तब्बल एक हजार 318 बस ब्रेकडाऊन झाल्या. यावर विविध समाजमाध्यमातून टीका झाल्यानंतर पीएमपी प्रशासन खडबडून जागे झाले असून, प्रशासनाने ठेकेदारामार्फत चालविल्या जाणाऱ्या बसवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने एकाच महिन्यात ठेकेदाराकडून 16 लाख 63 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) ठेकेदारामार्फत चालविल्या जाणाऱ्या बसचे ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता. पीएमपीकडे 1958 बस आहेत. त्यापैकी सुमारे 1500 ते 1550 बस दररोज मार्गावर धावत असतात. यातील 1156 बस या पीएमपीच्या मालकीच्या आहेत. तर, 802 बस ठेकेदाराच्या मालकीच्या आहेत. ठेकेदाराच्या बसचे सर्वाधिक ब्रेकडाऊन होत असल्याचे पीएमपीचे म्हणणे आहे. जुलै महिन्यात ठेकेदारांच्या तब्बल एक हजार 318 बस ब्रेकडाऊन झाल्या आहेत.
ब्रेकडाऊनच्या घटनांमुळे पीएमपीची प्रतीमा जनसामन्यांच्या मनात मलिन होत असल्याने पीएमपी प्रशासनाने ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ठेकेदांरावर दंडात्मक कारवाईबरोबरच मेंटेनन्स सुधारण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
– दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी