पाथर्डी – ज्या गावात नद्या खोलीकरणासह जलसंधारणाचे मोठे काम झाले, त्या गावात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर बोलवावे लागत नाही. शेकटे ग्रामस्थांनी उपलब्ध पाण्याची बचत करण्यासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून सेंद्रिय शेतीचा अंगीकार करावा.
पुढच्या पिढ्यांची तहान भागवायची असेल तर पाण्याची बचत करून काटकसरीने वापर करण्याची सवय ठेवा, असे प्रतिपादन पुणे येथील प्राज फौंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त तथा प्राज इंडस्ट्रीजच्या संचालिका परिमल चौधरी यांनी केले.
तालुक्यातील शेकटे येथे प्राज फौंडेशन पुणे, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ जनकल्याण समिती नगर (दक्षिण) व शेकटे ग्रामस्थ यांनी संयुक्तपणे केलेल्या नदी खोलीकरण व जलसंधारणाच्या कामाचे जलपुजन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानिमीत्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्राज फौंडेशनचे विनायक केळकर, नगर दक्षिण जनकल्याण समितीचे नगर दक्षिण कार्यवाह मनोहर देशपांडे, उपाध्यक्ष तथा उद्योजक अभय मेस्त्री, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पाथर्डी तालुका कार्यवाह अरविंद पारगावकर, जनकल्याण समितीचे पाथर्डी कार्यवाह प्रा. संतोष दहिफळे सरपंच बाळासाहेब घुले, दिलीप देवढे, संपत घुले, आखेगावचे सरपंच बाबासाहेब गोर्डे, सोनोशीचे सरपंच संजय दौंड, अंबादास साबळे, पांडुरंग फुंदे, बाबुराव घुले, जिजाबाई साबळे, सविता साबळे, गुलबस केदार, रुक्मिणी घुले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरपंच बाळासाहेब घुले यांनी, सुत्रसंचालन प्रा.संतोष दहीफळे यांनी केले. तर जनकल्याण समितीचे राजेश परदेशी यांनी आभार मानले.