तिसरा-चौथा ट्रॅक सर्वेक्षणापुरताच?

पुणे-लोणावळा ः केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये वारंवार तरतूद, मात्र परिस्थिती जैसे-थे

पिंपरी -रोज एक लाखाहून अधिक प्रवासी ज्या मार्गावर प्रवास करतात अशा पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या अनेकदा मागणी करूनही वाढत नाहीत. गेल्या तीन दशकांपासून पुणे, लोणावळा दरम्यान तिसरा व चौथा ट्रॅक व्हावा यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची मागणी आहे. मात्र, तिसरा आणि चौथा ट्रॅक हा सर्वेक्षणापासून सुरू होतो आणि सर्वेक्षणावरच संपतो. केंद्रीय अर्थसंकल्पात कित्येकदा तरतूद होते, परंतु काम होत नसल्याचे चित्र दिसत आहे. मंजुरी मिळून आणि केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद होऊनही केवळ स्थानिक राजकीय इच्छाशक्‍तीचा अभाव आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उदासीनतेमुळे हे काम रखडले असल्याचे दिसत आहे.

याबाबत राज्य सरकार स्थानिक महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्‍वासने दिली जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहराची लोकसंख्या सुमारे 75 लाखांच्या घरात पोहचली आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीस आली आहे. पुणे-लोणावळा या मार्गावर लोकल सुविधा मुंबईच्या धर्तीवर केल्या वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात संपू शकते. परंतु राजकीय इच्छाशक्‍तीचा अभाव आणि दोन्ही महापालिकांची उदासीनता हे काम तडीस नेऊ देत नसल्याचे दिसत आहे.

पुणे व लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र, त्याप्रमाणात लोकलची संख्या फारच कमी असल्याने या मार्गावरुन नागरिकांना दगदगीचा प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासूनच्या तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकची मागणीला केंद्र सरकारने मंजूर दिली. सुरुवातीला तिसऱ्या ट्रॅकसाठी सर्व्हेक्षण करण्यात आले, त्यानंतर, तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठीही सर्व्हेक्षण करण्यात आले. पुणे ते लोणावळा दरम्यान वारंवार सर्वे झाले. मात्र, प्रत्यक्षात कामकाजाला मुहूर्त काही मिळेना.

आर्थिक सहाय्य व भूसंपादन
तिसरा व चौथा ट्रॅक तयार करण्यासाठी भूसंपादन करणे अत्यावश्‍यक आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात रेल्वे ट्रॅकच्या बाजूला वसविण्यात आलेल्या झोपडपट्ट्या हटविणे आवश्‍यक आहे. परंतु राजकीय इच्छाशक्‍तीचा अभाव भूसंपादनाच्या आड येत आहे. तसेच स्वस्त आणि अत्याधिक प्रवाशांना सुविधा देऊ शकणाऱ्या रेल्वेला तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकसाठी आर्थिक सहाय्य करण्यात दोन्ही महापालिका विशेष रस दाखवत नाहीत.

या दोन्ही महापालिकांनी “मेट्रो’वर शेकडो कोटींची उधळण केली, परंतु लोकलसाठी मात्र हात आखडता घेतला आहे. यामुळे मंजुरी मिळालेला प्रकल्प पूर्ण होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून सुद्धा बघ्याची भूमिका घेतली जात आहे. आजघडीला पुणे व लोणावळा दरम्यान 44 लोकलच्या फेऱ्या धावतात. त्यात बहुतांश लोकल फेऱ्या ह्या ब्लॉकच्या नावाखाली बंदच असतात.

गेल्या दोन अर्थसंकल्पात तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकसाठी तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचा डीपीआर तयार असून राज्य सरकार, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्याकडून यासाठी आर्थिक मदत मिळणे आवश्‍यक आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबत प्रयत्न करुन लवकरच तोडगा काढण्यात येईल.

तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकच्या मागणीसाठी प्रचंड पाठपुरावा केला आणि ही मागणी मान्य करुन घेतली. मात्र, यापुढील कामकाज राज्य सरकार, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हातात आहे. यांच्याकडून निव्वळ आश्‍वासने मिळत आहेत. तर, रेल्वे प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे. लोकप्रतिनिधी निव्वळ श्रेय लाटण्यापुरते उद्‌घाटनासाठी येतात. मात्र, तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकबाबत गांभिर्याने विचार करताना दिसत नाही. नागरिकांच्या भावनेशी सत्ताधारी व राजकीय मंडळी खेळत आहेत.
– हर्षा शहा, पुणे रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्ष, पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.