उड्डाणपुलासाठी आता जॉईंट व्हेंचर
पुणे – महापालिकेकडून सिंहगड रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या दोन उड्डाणपुलांसाठी तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आल्या आहेत. पहिल्या दोन्ही निविदांना आवश्यक असलेला प्रतिसाद न मिळाल्याने महापालिका आयुक्तांच्या नवीन परिपत्रकानुसार, निविदांच्या अटी आणि शर्तीत बदल करण्यात आला असून आता या कामासाठी जॉईंट व्हेंचर असलेल्या कंपन्यांनाही सहभागी होण्यास परवानगी दिल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिकेकडून विठ्ठलवाडी ते फनटाईम आणि राजारामपूल येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हे पूल प्रस्तावित आहेत. या कामासाठी महापालिकेकडून निविदा काढण्यात आली. पहिली निविदा 18 टक्के जादा दराने आली होती.
त्यामुळे आयुक्तांच्या नवीन निविदा परिपत्रकानुसार, पालिकेने या निविदाधारकाशी चर्चा करून दर कमी करण्याची विनंती केली होती. मात्र, ठेकेदारांनी नकार दिला. त्यामुळे महापालिकेने पुन्हा फेरनिविदा काढली होती. त्यात प्रशासनाने जॉईंट व्हेंचरची अट शिथील करत त्याला परवानही दिली होती. त्यानंतर प्रशासनाने काढलेल्या निविदेत ही अट शिथील झाल्याची माहिती नसल्याने पुन्हा एकच कंपनी या कामासाठी आली. त्यामुळे प्रशासनाने ही निविदाही रद्द करत पुन्हा तिसऱ्यांदा निविदा काढली. त्यामुळे जॉईंट व्हेंचरनंतर या कामासाठी कंपन्या पुढे येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.