पुणे – अकरावी प्रवेशासाठी तिसरी फेरी घेण्यात येत असून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदविण्यास सुरुवात झाली आहे. दि. 12 डिसेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदविणे तसेच यापूर्वी भरलेल्या भाग-2 मधील पसंतीक्रम बदलता येईल, तसेच अर्ज तपासणे, नवीन विद्यार्थ्यांना भाग 1 व भाग 2 भरता येणार आहे. तिसरी गुणवत्ता यादी 15 डिसेंबरला जाहीर होणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या दोन फेऱ्या बुधवारी (दि.9) पूर्ण झाल्या. आता उर्वरित जागांसाठी तिसरी फेरी घेण्यात येत आहे. अद्याप 66 हजार जागा रिक्त आहेत. दि. 13 व 14 डिसेंबर रोजी पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी अंतिम केली जाणार आहे.
दि. 15 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांना लॉगीनमध्ये प्रवेशासाठी मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय दर्शविण्यात येणार आहे. तसेच, दुसऱ्या नियमित फेरीचे कट-ऑफ संकेतस्थळावर दशविण्यात येणार आहे. दि. 15 ते 18 डिसेंबरदरम्यान प्रवेश निश्चित करता येणार आहे. यादरम्यान, व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटा प्रवेश सुरू राहतील, तसेच नवीन विद्यार्थी नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग-1 भरणे सुरू होणार आहे.
20 डिसेंबर रोजी प्रवेशाची विशेष फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार आहे. यानंतर विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर होईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.