पिंपरी – महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात आता तृतीयपंथीदेखील उतरले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नताशा लोखंडे या रिंगणात उतरणार आहेत.
चिंचवड मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी जनहित लोकशाही पार्टीने तृतीयपंथी नताशा लोखंडे हिला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. नताशा या उच्च शिक्षित असून इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व आहे.
जनहित लोकशाही पाटीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नताशा म्हणाल्या की, चिंचवड विधानसभा क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहोत. तसेच तृतीयपंथींना कायद्याने अधिकार तर मिळाले, परंतु उच्च शिक्षण घेऊनही त्यांना नोकरी मिळत नाही.
त्यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विरो मोरे, उपाध्यक्ष मिलिंद साळवी, बाळासाहेब पाटोळे, असिफ शेख, निकिता मुख्यदल आदी उपस्थित होते. यावेळी पिंपरीतून पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रामचंद्र आल्हाट, भोसरीतून माजी नगरसेवक विश्वास गजरमल, चिंचवडमधून नताशा लोखंडे आणि मावळमधून संतोष चौधरी यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.