नगर – माध्यमिक शिक्षक सोसायटीची निवडणूक जाहीर झाल्याने जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यातील अंतर्गत राजकारण यानिमित्ताने चांगलेच तापले आहे. अर्ज सादर करण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने दोन्ही मंडळाच्या नेत्यांची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे.त्यातून तिसरे पॅनल तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक,शिक्षकत्तेर कर्मचारी व प्राध्यापकांची कामधेनू मानली जाणाऱ्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. 9 फेब्रुवारीला मतदान होत असून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील 1 हजार 203 मतदार असणाऱ्या जिल्ह माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालकांची पंचवार्षिक होत आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी जाहीर केला. माध्यमिक सोसायटीच्या संचालकपदाच्या 21 जागांसाठी निवडणूक होत आहे.
जिल्हभर सोसायटीचे कार्यक्षेत्र आहे. या निवडणुकीसाठी सध्या दोन आघाड्या परस्पर विरोधात मैदानात उतरल्या असून तालुकानिहाय बैठका, मेळावे यातून शिक्षक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सत्ताधाऱ्यांसमोर तिसरी आघाडी ही ऐनवेळी मैदानात उतरणार आहे,अशी चर्चा शिक्षकांमध्ये आहे. प्रा.भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पुरोगामी मंडळ, तर प्रा.अप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विरोधात परिवर्तन सेवा मंडळ गतवेळेप्रमाणे मैदानात उतरणार आहे. प्रा.कचरे यांच्या नेतृत्वाखाली गत सतरा वर्षापासून पुरोगामी सहकार मंडळाकडे एकहाती सत्ता आहे.
मात्र,गत निवडणुकीत विरोधी परिवर्तन मंडळाने मुसंडी मारून तब्बल पाच संचालक निवडून आणले. यावेळी या दोन्ही मंडळे एकमेकांविरोधात मैदानात उतरणार हे निश्चित आहे. दरम्यान,दोन्हीकडून उमेदवारी न मिळाल्यास काही इच्छुक उमेदवारांनी एकत्र मोट बांधून तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कोण इच्छुक यानिमित्ताने दिसून येणार आहे.