शासन सकारात्मक : उपमुख्यमंत्री अजित पवार
विधानसभेत आमदारांच्या लक्षवेधीला उत्तर
पुणे – पुणे शहरालगत असलेल्या वाघोली, मांजरी बुद्रुक, मांजरी खुर्द यांसह आणखी काही गावांचा समावेश करून नवीन महानगरपालिका स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. याबाबत निर्णय झाला, तर पुणे, पिंपरी-चिंचवडपाठोपाठ शहरात तिसरी महापालिका निर्माण होणार आहे.
शहरालगतच्या वाघोली भागातील रस्ते वाहतूक, पाणीपुरवठा आदि समस्यांबाबत आमदारांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
पुणे शहरामध्ये काही गावे समाविष्ट करण्याची त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड सोडून बाकीचा इतर भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत (पीएमआरडीए) आला आहे. परंतु या कामाला गती देण्याची गरज आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुणे महानगर क्षेत्रातील वाघोली गाव शहरालगत असल्याने वेगाने नागरीकरण होत आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे सध्याचा 2.5 एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत वाढीव 5 एमएलडी पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. पुणे-शिरूर-नगर रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चार पदरी रस्त्याचे सहापदरीकरण सुरू करण्यात आले आहे.
वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापनासाठभ प्राधिकरणाने ग्रामपंचायतीला 15 कचरावाहू वाहने उपलब्ध करून दिली आहेत. तसेच हवेली व मुळशी तालुक्यांतील 8 गावांकरिता घनकचरा व्यवस्थापनासाठी पूर्वसुधारणेचा अहवाल तयार करून घेण्याची कार्यवाही प्राधिकरणाच्या स्तरावर सुरू आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.