गोवर-रूबेला लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात तिसरा

108 टक्‍के मोहीम फत्ते : उद्दिष्टांपेक्षा अधिक बालकांना लाभ

पुणे – जिल्ह्यात आरोग्य विभागाने गोवर-रूबेला लसीकरण मोहीम फत्ते केली आहे. जिल्ह्यात 108 टक्‍के लसीकरणाचे काम झाले असून, 10 लाख 40 हजार 877 बालकांना लसीकरणाचे उद्दिष्टे असताना, 11 लाख 22 हजार 64 बालकांना लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रमुख डॉ. दिलीप माने यांनी दिली. उद्दिष्टांपेक्षा अधिक बालकांना लसीकरण देऊन पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राज्यात तिसरा स्थानी राहण्याचा मान पटकविल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

केंद्र आणि राज्य शासनाकडून गोवर-रूबेला लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, सभापती प्रवीण माने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने पहिल्या दिवसांपासून आघाडी घेत लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. जिल्हा परिषदेसमोर 13 तालुक्‍यांतील शाळा, अंगणवाड्या आणि घरी असलेली 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 10 लाख 40 हजार 877 बालकांना लसीकरण देण्याचे उद्दिष्टे होते. त्यानुसार डॉ. दिलीप माने यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा यांच्या मदतीने महिनाभर लसीकरण मोहीम सुरू होती.

त्यामध्ये सर्वांधिक हवेली तालुक्‍यात 2 लाख 75 हजार 501 बालकांना लस देण्यात आली, तर खेड तालुक्‍यातील 1 लाख 22 हजार 945 आणि शिरूर तालुक्‍यात 1 लाख 12 हजार 835 बालकांना लस दिली आहे. सर्वांत कमी वेल्हा तालुक्‍यात 13 हजार 475 उद्दिष्टांपैकी 9 हजार 591 उद्दिष्टे पूर्ण झाले. 15 जानेवारी 2019 नंतर लसीकरणातून सुटलेल्या बालकांचा सर्वे करून त्यांना लसीकरण देण्यात आले. तसेच, बांधकाम साईट, कारखाने यासह अन्य ठिकाणी असलेल्या बालकांनाही लस देण्यात आली. त्यामुळे दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक टक्‍के लसीकरण झाले.

आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चांगल्या कामामुळे राज्यात जिल्हा परिषद पहिल्या तीनमध्ये आहे. त्याप्रमाणे गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेतही वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी यासह सोशल मीडिया आणि पालकांनी मोलाची साथ दिली. त्यामुळे उद्दिष्टे पूर्ण करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
– डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.