मुंबई – राज्यभरात सध्या मुले चोरणाऱ्या टोळीची अफवा पसरली असून पालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मुले चोरणारे लोक समजून अनेकांना नाहक मार खावा लागल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. असाच एक प्राकर भिवंडी तालुक्यातील परिवली गावात घडला. कामाच्या शोधात गावात भटकंती करणाऱ्या तरूणाला मुलं चोरणारा समजून बेदम मारहाण करण्यात आलीय.
शंकर नागोराव गुंडगुडे (वय 28) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. व्हायरल व्हिडीओमुळे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
शंकर हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील चिखली गावाचा रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. गावाकडे काम नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासून कामाच्या शोधात भिवंडी तालुक्यात आला होता. कामाच्या शोधात पारवली गावात पोहचला असता पारवली गावातील काही तरुणांनी त्याला मुलं पळविणारा असल्याचे समजून बेदम मारहाण करून एका झाडा बांधून ठेवले. त्यानंतर पोलीसांना या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शंकरकडे चौकशी केली असता तो मजुरीच्या शोधात पारवली गावात आल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्या नावाची नोंद करून त्याला सोडून देण्यात आले. मात्र, व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणांनी पुरेशी खातरजमा न करताच शंकरला बेदम मारहाण केल्याने समाज माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवाय मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येत. मुले चोरणारी टोळी समजून माहिती न घेता कोणालाही मारहाण करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.