पक्षाच्या विचारसरणीचा विचार करा ः डॉ. विखे

शेवगाव – जिल्ह्याची राजकीय संस्कृती ही खूप वेगळी आहे. या संस्कृतीचा विचार जपण्याचे काम या निवडणुकीच्या निमित्ताने करावे लागणार आहे. राजकीय पक्षांच्या विचाराबरोबरच उमेदवारांच्या विचारसरणीचाही विचार करा. शेतकरी, पाणी व युवकांसाठी रोजगार हाच माझा निवडणुकीतील अजेंडा आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

तालुक्‍यातील बोधेगाव येथे आयोजित सभेत डॉ. विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, तालुक्‍याच्या पाणी प्रश्‍नाची सोडवणूक करणे हेच आपले अंतिम ध्येय्य आहे. यापूर्वी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी या भागाच्या पाण्यासाठी संघर्ष केला, तोच विचार घेऊन संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करणारा लोकप्रतिनिधी म्हणून मला काम करायचे आहे, असे त्यांनी आश्‍वासित केले.

शेवगाव तालुक्‍यात आ. मोनीकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची प्रक्रिया सुरू आहे. याला माझीही साथ मिळाली, तर ही प्रक्रिया अधिक गतीने पुढे जाईल. निवडणुका आल्या की स्वार्थासाठी जवळ येणारी माणसे खूप असतात. आपल्या पदरात काय पडेल याचाही विचार असतो. पण ज्यांना जनतेच्या प्रश्‍नांशी काहीही देणे-घेणे नाही, त्यांनी कधी पाण्याचा अभ्यासही केला नाही, ऊसउत्पादकांचे प्रश्‍न त्यांना माहीत नाहीत. शेवगावमध्ये ते कधी फिरकले का? असा प्रश्‍न उपस्थित करुन डॉ. विखे पाटील म्हणाले, आज समोरच्या उमेदवाराचे सामान्य माणसांबरोबरच फोटो दिसू लागले आहेत. पण अशा फोटोंमधून प्रतिमा तुम्ही बदलू शकणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

आ. राजळे म्हणाल्या, डॉ. विखे पाटील यांनी मागील 3 वर्षांत या भागातील प्रश्‍नांसाठी पाठपुरावा करुन निधीची उपलब्धता करुन दिली. सामान्यांच्या हितासाठी लोकांपर्यंत पोहचणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. सुभाष कोहरे, कमलताई खेडकर, रज्जाक शेख, मनोज घोरपडे, राजेंद्र बनसोडे, बापूसाहेब पारेकर आदींसह महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.