‘आमच्या पुढील शैक्षणिक वर्षाचाही विचार करा’

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची सरकारला विनवणी : परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी हैराण

पिंपरी – राज्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गेले वर्षभर विद्यार्थ्यांचा ऑनलाइन पद्धतीने अभ्यास सुरू आहे. तर राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्येच आता परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत परीक्षा एवढ्या उशीरा होणार असतील तर आमच्या पुढील शैक्षणिक वर्षाचे काय? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षा पुढे न ढकलता आताच इंटरनल असेसमेंटच्या गुणदान शैलीनुसार विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

गेल्या वर्षाभरापासून दहावी व बारावीचे विद्यार्थी परीक्षेच्या मानसिक तणावाखाली आहेत. दहावीची परीक्षा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्यात येणार आहे. तोपर्यंत करोनाचा संसर्ग कमी होण्याची कोणतीही स्थिती नाही. त्याला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.

राज्यामध्ये दररोज एक हजाराहून अधिक बालकांना करोनाची लागण होत आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. शासन ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत ठाम असल्याचे दिसून येत आहे. यासाठी शासनाने काही पालकांचा व विद्यार्थ्यांचा सर्व्हे केला. त्यामध्ये अवघ्या 2600 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तर विद्यार्थ्यांनी याबाबत सर्व्हे केला तर त्यामध्ये 3 लाख विद्यार्थ्यांचा सर्व्हे आहे. ते 3 लाख विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या विरोधात आहे. मग 2600 जणांच्या सर्व्हेवरून 31 लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार शासन का करत आहे असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

करोनामुळे परीक्षामध्ये चालढकल सुरू असल्याने विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. यामुळे परीक्षांचा निकाल, पुनर्परीक्षा, प्रवेश प्रक्रिया आणि महाविद्यालय सुरू होण्यास मोठा विलंब होणार आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षदेखील बाधित होणार आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल उशीरा लागला, त्यामुळे अकरावीचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झाले.

अवघ्या दोन महिन्याचा अभ्यास त्यांना करता आला. त्यांना पास केले असले तरी त्यांचा पाया कच्चा असल्याने ते बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुणाने पास होण्याची शक्‍यता आहे. हीच फसगत आता शासन दहावीतील विद्यार्थ्यांसोबत करत असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द कराव्यात. तसेच इंटरनल असेसमेंटच्या गुणदान शैलीचा वापर करत विद्यार्थ्यांना पास करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

परीक्षा रद्द करण्यासाठी 10 लाख ट्विट
विद्यार्थ्यांनी यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलने केली आहेत. तसेच 10 लाख ट्विट केले आहेत. यामध्ये राज्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेकांनी आपले मत नोंदवले आहे. यामध्ये अनेक नेत्यांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा रद्द करून इंटरनल असेसमेंटच्या गुणदान शैलीचा वापर करून उत्तीर्ण करण्यासाठी विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांचाही पाठिंबा आहे. असे असतानाही सरकार 31 लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अट्‌हास का करत आहे असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपला जीव महत्त्वाचा आहे. एका विद्यार्थ्याला करोनाची लागण झाली तर त्याच्यासोबत त्याच्या घरातील चार जणांनाही लागण होणार आहे. शासन जरी सांगत असले की आम्ही परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांची काळजी घेऊ, मात्र केंद्राबाहेर काय. पुणे शहरात एमपीएससीच्या चार विद्यार्थ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरातील परिस्थितीची शासनाला जाणीव नसेल. त्यामुळे आमच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी आहे.
– अनिष राजेंद्र काळभोर, विद्यार्थी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.