बंगळुरू : देशात अनेक राज्यात मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे घर, संसार या पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. दरम्यान, या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्याशिवाय सर्वसामान्य नागरिकदेखील या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. त्यातच आता कर्नाटकमधील असाच एक मदतीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कर्नाटकमधील एक तहसिलदार चक्क आपल्या डोक्यावर तांदुळाचे पोते घेवून पुरग्रस्तांपर्यंत पोहचवताना दिसत आहेत.
कर्नाटकच्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील बेल्थानगडी तालुक्याचे तसहिलदार चक्क स्वत:च्या डोक्यावर तांदुळाचे पोते वाहून नेताना दिसत आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी तहसिलदार पुढे सरसावले असल्याचे दिसत आहेत. गणपती शास्त्री असे या तहसिलदाराचे नाव आहे. पुर आलेल्या भागात एका तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या पुलावरुन ते मार्ग काढत गावातील लोकांना अन्नधान्य घेऊन जाताना दिसत आहेत. त्यांच्या या कामामुळे इथल्या पुरग्रस्तांनी त्यांचे आभार तर मानले आहेत पण त्यांच्याकडे पाहूण पुन्हा एकदा नव्या जोमाने उभं राहणार असल्याचे सांगितले आहे.